डीआरडीओ विकसित करणार रणगाडाभेदी क्षेपणास्त्र

- इस्त्रायल सोबतच ५० कोटी डॉलर्सचा करार रद्द

DRDO

दिल्ली : इस्त्रायली कंपनी राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिमच्या ‘स्पाइक’ या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रासारखे क्षेपणास्त्र विकसित करण्याची हमी डीआरडीओने दिल्यानंतर भारताने इस्त्रायलसोबत ‘स्पाइक’साठी केलेला ५० कोटी डॉलर्सचा करार रद्द केला.

‘स्पाइक’सारखे क्षेपणास्त्र दोन वर्षांच्या आत विकसित करण्याचे आश्वासन डीआरडीओने दिले आहे.

हा करार रद्द करण्यात आल्याची माहिती इस्त्रायलला देण्यात आली आहे असे या कराराशी संबंधित असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हीईएम टेक्नोलॉजीस लिमिटेडसोबत मिळून डीआरडीओ कमी किंमतीत स्पाइक सारखेच क्षेपणास्त्र विकसित करत आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अहमदनगर रेंजवर एमपीएटीजीएमची यशस्वी चाचणी केल्याचा दावा डीआरडीओने केला आहे.

डीआरडीओने रणगाडाभेदी क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी दिलेल्या मुदतीबद्दल लष्करी अधिकाऱ्यांच्या मनात संशय आहे. मात्र, ‘मेक इन इंडिया’ धोरणाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने डीआरडीओची निवड केली आहे. वेळकाढू आयतीवर अवलंबून राहण्याऐवजी अधिकारी आता देशांतर्गत बनणाऱ्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांना प्राधान्य देत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.