डॉ. विजय भटकर यांचा पुतण्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार

नांदेड : नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भरती घोटाळ्याचा सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात ओएमआर आॅपरेटर प्रवीण भाटकर तसेच अन्य एकजण असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतःची कंपनी काढून डाटा कलेक्ट केला. त्यासाठी भटकरांच्या नावाचाही उपयोग केला. पुण्यातील बावधनमध्ये त्याने ओएमआर कंपनी काढून हे उद्योग केले.

भटकर यांचं मूळ गाव अमरावतीमधील मुर्तीजापुर आहे. त्यामुळे प्रवीण भटकरही आपलं गाव अमरावती असल्याचं सांगतो. डॉ. विजय भटकर यांनी प्रवीण इटीएचमध्ये काम करत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र आपण तीन वर्षांपूर्वीच कंपनीचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे. आपल्या गावातील अनेक जण भटकर आडनाव लावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. घोटाळ्याच्या सूत्रधाराशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचंही डॉ. भटकरांनी स्पष्ट केलं आहे.