डॉ. सुजय विखे यांना चौकशीसाठी पोलीस बजावणार समन्स

- रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा

Maharashtra Today

नगर : भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे यांनी खासगी विमानाने रेमडेसिविर इंजेक्शन (Remedesivir injection) आणल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जबाब देण्यास उपस्थित राहण्यासाठी पोलीस शनिवारी खासदार डॉ. विखे यांना समन्स बजावणार (Dr. Sujay Vikhe will be summoned by the police)असल्याचे कळते.

दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपवली आहे. नेटके यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या पथकाने शिर्डीतील विमानतळाला भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.

राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. दरम्यान, खा. विखे यांनी खासगी विमानाने रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याचे प्रकरण वादात सापडले आहे. जिल्ह्यतील विखे कुटुंबीयांचे परंपरागत विरोधक असणाऱ्या काही जणांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्या इंजेक्शनचे पृथक्करण करावे व त्या इंजेक्शनचे रुग्णांना वाटप करावे अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच गृह विभागाच्या सचिवांना शिर्डी विमानतळावरील १० ते २५ एप्रिल दरम्यानच्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून ते जतन करण्याचे तसेच विमानातील खोक्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे सोपवली आहे. या प्रकरणातील चौकशीत जबाब देण्यास हजर राहण्यासाठी पोलीस खा. विखे यांना समन्स बजावणार असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button