डॉ. अभिनव देशमुख सरफ़रोशीवर कोल्हापूरकर खूष

Superintendent of Police Abhinav Deshmukh

कोल्हापूर : सरफ़रोश म्हणजे ‘जान की बाज़ी लगा देने- वाला, जाँनिसार’ हे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना चपखल बसते. गडचिरोलीत नक्षल चळवळ त्यांनी मोडीत काढली. गावेच्या गावे मु्ख्य प्रवाहात आणली. आपल्या वर्दीप्रती, कर्तव्याप्रती, असलेल्या अधिकार आणि सामाजिक सुरक्षेप्रती सरफरोश असल्याचे सातारा, गडचिरोली अन्‌ कोल्हापुरातील त्यांच्या कामातून अनेकवेळा अधोरेखित झाले. काळेधंद्या विरोधात डॉ. देशमुख यांनी उघडलेल्या आघाडीमुळे कोल्हापूर करात त्यांच्या सरफ़रोशी वर कोल्हापूरकर बेहद खूष आहेत.

कोल्हापूरच्या इतिहासात शिवप्रतापसिंह यादव यांच्या काळात २५ वर्षापूर्वी आणि त्यानंतर डॉ. मनोजकुमार शर्मा आणि आता डॉ. देशमुख यांच्या कारकिर्दीत असा फक्त तीनच वेळा मटका हद्दपार झाला. यापूर्वी चिल्यापिल्यांना मोक्का लावून ‘मोका’ साधण्याचा उद्योग होत होता. डॉ. देशमुख यांनी थेट गच्च्यालाच हात घालत मोक्का कारवाईचे अर्धशतक पार केले आहे.

डॉ देशमुखांनी काळेधंदेवाल्यावरील कारवाई कोल्हापुरी भाषेत सांगायची तर ‘काटा कीर्रर्र खटक्यावर बोट जाग्यावर पल्टी’ अशीच प्रतिक्रिया आहे. कोल्हापुरातील मटक्याची रोजची उलाढाल अंदाजे ५० कोटी रुपयांची तर क्रिकेटसह सट्टा बाजाराची उलाढालही तितकीच आहे. यावरुन या धंद्याची ताकद लक्षात येते. मटका बंद होवू नये, म्हणून यंत्रणाच देव पाण्यात घालून असते. असे असताना डॉ. देशमुख यांनी कारवाईच्या धाकाने मटका हद्दपार केला. कोल्हापुरातीलच नाही तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातील मटकासम्राटही डॉ. देशमुख यांच्या धास्तीने अंडरग्राउंड झाले आहेत.

डॉ. देशमुख यांच्या चेंबर बाहेर भेटायला येणाऱ्याची गर्दी आणि बाहेर पडल्यानंतर काम झाल्याचा आनंद ही त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणावी लागेल. फेसबुकवर जाहीरपणे हा माझा मोबाईल क्रमांक असून त्यावर बिनदिक्कीत तक्रार असे जाहीरपणे सांगणारा आयपीएस अधिकारी दुर्मिळच म्हणावा लागेल. वाहतुकीच्या कोंडीपासून पोलीस ठाण्यातील विलंबाबत कसल्याही वैयक्तिक व सामाजिक तक्रारीची दखल घेतली जाते हा विश्वास कोल्हापूकरांत निर्माण करण्यात डॉ. देशमुख कमालीचे यशस्वी झाले आहेत. कोल्हापूरकरांना आश्वासक वाटणाऱ्या अधिकाऱ्यांची खूप छोटी यादी आहे. त्यात डॉ. देशमुख यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. मोक्का कारवाईत काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रावर ‘हर मुजरिम को मैं कानून के सामने भिखारी की तरह खडा देखना चाहता हूं’ हे वाक्य लिहलेले प्रमाणपत्र डॉ. देशमुख यांनी दिले. त्यावरुनच त्यांचा इरादा स्पष्ट होतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत, हे कृतीतून दाखवून देणाऱ्या डॉ. अभिनव देशमुख यांच्या ‘सरफरोशीने कोल्हापूरकर सुखवल्याचे वास्तव आहे.