विरोधक नाराज झाल्यानेच स्मारकातील पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

Dr Babasaheb Ambedkar-Indu Mill

मुंबई : कालच ठरलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा अचानकच पुढे ढकलण्यात आला आहे. दादर येथील इंदू मिल (Indu Mill) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता पायाभरणी सोहळा होणार होता. याबाबत कालच सूचनाही देण्यात आल्या होत्या.

मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केवळ १६ जणच निमंत्रित होते, विरोधी पक्षातील नेत्यांना याचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. तसेच सरकारमधील काही मंत्र्यांनाही वेळेवर निमंत्रण न मिळाल्याने सोहळ्याला हजर राहणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वच बाजूने नाराजीचा सूर उमटत असल्याने आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख निश्चित करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच सोहळ्याची तारीख घोषित करू, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम नियोजित होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांची नावं निमंत्रितांच्या यादीत होती. नंतर या यादीत आनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER