बाबासाहेबांचे स्मारक दोन वर्षांत, ठेकेदार-अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावे : शरद पवार

मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकेल, फक्त संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे.

इंदू मिल येथील स्मारकाच्या जागेची शरद पवार यांनी आज मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार म्हणाले, स्मारकाचे काम २५ टक्के पूर्ण झाले असून, ७५ टक्के काम बाकी आहे. ज्या कंपनीकडे हे काम आहे, ती आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था असून, त्यांनी मनापासून ठरविले आणि सर्व परवानग्या मिळाल्यात, तर दोन वर्षात काम पूर्ण होणे अशक्य नाही. आव्हान म्हणून काम स्वीकारायला हवे.

जगभरातील बौद्ध समाजात या स्मारकाचे आकर्षण राहील. हे स्मारक महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.