वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे वेतन दुप्पट करा

आ.सतीश चव्हाण यांची मागणी

Satish Chavan

औरंगाबाद :- देशभरासह राज्यातदेखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मात्र असे असतानादेखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन दुप्पट करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नायर रुग्णालयातील एका निवासी डॉक्‍टरला कोरोनाची लागण , सहकारी भयभीत

उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, हरियाणा सरकारने कोरोनाविरुद्ध लढणार्‍या त्यांच्या राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओडिशा सरकारनंदेखील त्यांच्या राज्यातील वैद्यकीय कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचे वेतन आधीच देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यातदेखील विविध शासकीय रुग्णालयांत काम करणारे डॉक्टर, कर्मचार्‍यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर, कर्मचार्‍यांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. घरी आल्यानंतर अनेकांना स्वत:ला विलगीकरण करून घ्यावं लागत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे आपणदेखील राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.


Web Title : Double the salary of medical staff : satish chavan

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)