‘काळजी करू नका, पंढरपूरचा करेक्ट कार्यक्रम आम्हीच करू !’ जयंत पाटलांचा पवारांना शब्द

Jayant Patil - Sharad Pawar

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. लवकरच विधानसभेच्या या जागेसाठी मतदान होणार असून, राष्ट्रवादीने हा गड कायम राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आणि अशातच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, पुढचे २० दिवस ते घरातच आराम करणार आहेत. त्यामुळे पवार हे उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचा (NCP) हा गड कायम राखण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिला आहे. “पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करू नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा करेक्ट कार्यक्रम आमचा आम्ही करतो.” असा शब्द जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पवारांना दिला आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करू नका, असं सांगितलं आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचं नियोजन लवकरच होईल.

भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याबाबत सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. भालके यांचा विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.  अर्ज माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सर्व कायकर्ते घराघरांत  जाऊन प्रचार करतील.  कोरोना काळ असला तरी अनेक राज्यांत  विधानसभा निवडणुका सुरू आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं लॉकडाऊन (Lockdown) विरोधातील वक्तव्य बेजबादारपणाचं आहे. लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकमताने निर्णय घेतो. आम्हा तिघात भांडण लावण्याचा खटाटोप चंद्रकांतदादा आणि त्यांचे सहकारी करत आहेत, मात्र त्यांना यश येणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button