मी सुखरूप आहे काळजी नसावी

Suyash Tilak

एकीकडे नाटकाचे प्रयोग ,दुसरीकडे मालिकांच्या कॉल टाईमचे वेळापत्रक, तर तिसरीकडे सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा हे सगळं गणित जुळवत असताना कलाकारांचा प्रवास हा गेल्या काही वर्षात अधिक जोखमीचा झाला आहे. मालिकेचा कॉल टाईम गाठण्यासाठी कलाकारांची धावाधाव सुरू असते. त्यामुळे कधीकधी हा प्रवास अधिक धोकादायक बनू शकतो. असंच काहीस अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याच्या बाबतीत झालं. शनिवारी प्रवास करत असताना महामार्गावर त्याच्या गाडीला अपघात झाला. ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि सुयशच्या सोशलमिडिय पेजवर त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी कमेंटवर कमेंट केल्या. गाडीला अपघात झाला असला तरी तो आणि त्याचा ड्रायव्हर सुखरूप होते. अर्थात हे दोघेही थोडे जखमी झालेत पण काळजी करण्यासारखं काही नाही. विशेष म्हणजे सुयशने त्याच्या ड्रायव्हरला गाडीतून सुखरूप बाहेर काढत प्रसंगावधान राखलं. त्याच्या सोशल मीडिया पेजवरून तो सुखरूप असल्याचं सांगत काळजी करू नका अशा शब्दात चाहत्यांची संवाद साधला.

शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत शंतनूची भूमिका करत असलेला सुयश टिळक याने गेल्या काही वर्षात मालिका विश्वात आपले स्थान बळकट केले आहे. का रे दुरावा या मालिकेतून सुयशची नायक म्हणून छोट्या पडद्यावर एंट्री झाली. त्यानंतर बापमाणूस मधला कोल्हापूरकर सूर्यकांत त्याने चपखल रंगवला. दूर्वा या मालिकेत त्याची छोटीशी भूमिका होती . सध्या त्याची शुभमंगल ऑनलाईन ही मालिका लोकप्रिय आहे.

मालिका, सिनेमे, वेबसिरिज तसेच वेगवेगळ्या ब्रँडसाठी फोटोशूट या निमित्ताने सुयश चर्चेत असतोच. पण गेल्या काही दिवसात तो अभिनेत्री अक्षया देवधरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ही चर्चेत आहे. खरतर या दोघांच्या जोडीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. परंतु गेल्याच महिन्यात या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचं त्यांच्या पोस्टवरून दिसून आलं.अर्थात हा आमच्या दोघांचा पर्सनल विषय असून जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही याविषयी बोलू असं म्हणत त्याने या विषयावर पडदा टाकला होता. कायम सोशल मीडियावर सक्रिय असलेला ,अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारा सुयश टिळक अचानक सोशल मीडियापासून लांब गेला, सोशल मीडिया ला रामराम ठोकत असल्याचं असल्याची पोस्ट करत त्याने हा दुरावा चाहत्यांना सांगितला होता. यामुळे सुयश अधिक चर्चेत आला. अक्षया देवधर हिच्यासोबत झालेला ब्रेक-अप मुळेच त्याने सोशल मीडियापासून स्वतःला अलिप्त केलं की काय अशी चर्चा रंगली होती. पण हा विषय देखील सुयशने त्याच्या संयमी स्वभावाने व्यवस्थित हाताळला.

पर्यावरण शास्त्राचा विद्यार्थी असलेला सुयश हा वैयक्तिक जीवनातही पर्यावरण संवर्धनासाठी सतत काही ना काही प्रयोग करत असतो. केवळ सेलिब्रिटी म्हणून सोशल मीडियावर पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारण्यापेक्षा तो खऱ्या आयुष्यातही पर्यावरण जपण्यासाठी स्वतःचे योगदान देत असतो. जिथे कुठे पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्था आहेत ,व्यक्ती आहेत त्यांची माहिती त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. एक चांगला अभिनेता आणि उत्तम पर्यावरणप्रेमी अशी ओळख असलेल्या सुयशने त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

दोन दिवसापूर्वी सुयशला अपघात झाल्याची बातमी जेव्हा मनोरंजन विश्वात पसरली तेव्हा अर्थातच सोशल मीडियामुळे ती त्याच्या चाहत्यांना पर्यंतही पोहोचली .सुयशच्या इन्स्टा, फेसबुक पेजवर खुशाली विचारण्यासाठी चाहत्यांकडून खूप सार्‍या कमेंट आल्या. अर्थात हा अपघात झाल्यामुळे आणि किरकोळ जखमी असल्यामुळे त्यावेळेला तो चाहत्यांना उत्तर देऊ शकत नव्हता. अपघातानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा स्वतःहून त्याने एक फोटो पोस्ट करत मी सुखरूप असल्याची वार्ता त्याच्या चाहत्यांना दिली. तरीही त्याच्या चाहत्यांकडून अशा पद्धतीचा धोकादायक प्रवास आणि धावपळ दगदग करू नको असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी त्याला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER