घाबरू नका काळजी घ्या,पण कोरोनाला सहजही घेऊ नका – खा. इम्तियाज जलील

हात न मिळवता सलाम-नमस्ते करण्याचे केले आवाहन

Imtiaz Jalil

औरंगाबाद : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहे. शहरात आज एक पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हात न मिळवता सलाम-नमस्ते म्हणा जेणे करून कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही. असे आवाहन एमाआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नागरीकांना केले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. घाबरू नका, काळजी घ्या, पण कोरोनाला सहजही घेऊ नका अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

शहरात पॉझिटीव्ह रूग्ण अाढळला तरी पॅनिक होण्याची गरज नाही. पण ज्या साध्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात त्या आपण केल्या पाहिजे. तसेच शहर आणि जिल्ह्याचा या धोकादायक रोगापासून बचाव करण्याच्या दृष्टीने आपण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून आढावा घेतला आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास दिला आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असल्या तरी ज्यांच्या परीक्षा सुरू आहेत त्या परिक्षार्थींना परिक्षा केंद्रांवर सॅनिटायझर किंवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देण्याचे आणि शक्य झाल्यास मास्क पुरवण्याचे ही आपण जिल्हाधिकाऱ्यांना सुचवले आहे. असे खा. इम्तियाज जलील म्हणाले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळा-परिक्षा केंद्रांना याबाबत कळवण्याचे आश्वासन दिल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.