माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका; निर्णय घेण्यास मी खंबीर – पंकजा मुंडे

Pankaja Munde

अंबाजोगाई : मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांच्या अस्थिरतेच्या चर्चांना पेव फुटले. पंकजा मुंडे यांच्यासोबतच एकनाथ खडसे यांच्याही नाराजीची चर्चा आणि मग त्यांनीच पक्षात राहून पक्षाविरुद्ध सूर काढणे सुरू केल्याने या चर्चेला अधिकच रंग प्राप्त झाला.

एवढेच नाही तर गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर या दोन नेत्यांच्या नारजीची आमि पक्षांतराची चर्चा अधिकच रंगत गेली. आता एकनाथ खडसेंनी अखेर करून दाखवले.व भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे झालेत. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्याही पक्षांतराच्या चर्चांना ऊधाण आले. मात्र, या चर्चांना पंकजा मुंडे यांनी चांगलेच खडसावून उत्तर दिले आहे.

माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अफवा पसरवणा-यांचा समाचार घेतला.

अंबाजोगाईत आ. नमिता मुंदडा यांच्या वतीने शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देतांना पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर आ. नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाचा कालावधी असल्यामुळे मी मुंबईत अडकून राहिले. मी जर घराबाहेर पडले असते तर माझ्या भोवती मोठा जमाव जमा झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर निघणे टाळले. याचा मोठा गैरअर्थ करून पंकजाताई घराबाहेर पडत नाहीत. अशा अफवा पसरविण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा स्थितीत खा. डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा प्रत्येक कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत होते. त्यांना दिलासा देत होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER