आम्हाला मुख्यमंत्रिपदाचे पत्र हवे; संजय राऊत यांची गडकरींना अट

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरील चर्चेची अट ठेवत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा, असे सांगितल्याने भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. मात्र, आम्हाला  मुख्यमंत्रिपदाचे  पत्र हवे. ते असेल तरच चर्चेसाठी यावे, अशी थेट अटच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नितीन गडकरींपुढे ठेवली आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार बनण्यासाठी भाजपने ५०-५० टक्के सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली आहे. याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. हा मसुदा घेऊन नको, तर मुख्यमंत्रिपदाबाबतचे अधिकृत पत्र असेल तरच गडकरींनी चर्चेला यावे, असा इशारा राऊत यांनी गडकरींना दिला आहे.

आम्हाला  मुख्यमंत्रिपदाचे  पत्र हवे, असे राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, संजय राऊत हे तातडीने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले असून गेल्या आठवडाभरात त्यांनी तिसऱ्यांदा पवार यांच्या ल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिली आहे. यामुळे एकीकडे भाजपचे नेते ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असताना राऊत यांनी पवारांचे निवासस्थान गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करणार – संजय राऊत

यातच काही वेळापूर्वी रामदास आठवलेंनी पवार यांची भेट घेतली आहे. राज्यात सत्तास्थापनेवरून राजकीय घडामोडींना आज वेग आलेला आहे. आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे ते  मुख्यमंत्रिपदाचा  राजीनामा देतात की सत्तास्थापनेचा दावा करतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.