गैरसमज पसरवू नका; मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही – जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असून काही मराठा नेत्यांनी त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे, असा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशाला विरोध म्हणून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खुलासा केला आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा विचार नाही. त्याबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी हा खुलासा केला. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यात येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचे आरक्षण सामील करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नाही. गैरसमज पसरवू नका, असे ते म्हणालेत.

प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षण तसंच नोकरभरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मराठा नेते आणि संघटनांवर जोरदार टीका केली. मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा आरोप केला होता.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल. ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा आरक्षणाचे राजकारण होते आहे. ओबीसी समाजाचे ताट खेचण्याचा प्रयत्न होतो आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी ३ तारखेला राज्यव्यापी आंदोलन करू, असे शेंडगे म्हणाले.

ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लगोलग मान्य केल्या. सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरती थांबवली. १३ टक्के जांगांसाठी ८७ टक्के जागांची अडवणूक का? असा सवाल करत मराठा समाजाच्या १३ टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER