‘महाराष्ट्रात रेमिडिसीवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी’, नवाब मालिकांचा आरोप

Nawab Malik

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) गंभीर स्वरुपाचा आणि तितकाच खळबळजनक आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर (Remdesivir) इंजक्शन विकू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. मलिक यांनी याबाबत पुरावे सादर करावे अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शनची विक्री करण्याला परवानगी मिळालेली नाही. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या 16 निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रेमडेसिवीरचं उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्रसरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरचे इंजेक्शन पुरवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजक्शन, ऑक्सिजन, आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री याबाबत पंतप्रधान मोदींशी (PM Narendra Modi) संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पंतप्रधान पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. एकीकडे देशात हाहाकार माजला असताना पंतप्रधानांची संवेदनशीलता कुठे गेली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पंतप्रधानांनी तात्काळ लक्ष घालून महाराष्ट्र सरकारने केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही मलिक यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button