भाविकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका; भाजपाचा आंदोलनाद्वारे इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात आज भारतीय जनता (BJP) पार्टीच्यावतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी ‘मंदिरे उघडा’ (Open Temple) यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र झाले. “मंदिर बंद, उघडले बार…उद्धवा, धुंद तुझे सरकार”, “धार्मिक स्थळे सुरू करा”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पंत बाळेकुंद्री महाराज भक्त मंडळाच्या भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय गीते साजरी करून उद्धव सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, गेले सात महिने कोरोनाचे संकट चालू आहे. देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला होता. त्यावेळी आम्ही मंदिरे उघडा, असे म्हटले नाही; पण सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरू, पण मंदिरे बंदच आहेत. हिंदू धर्मामध्ये अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेला की, त्याचा मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी आहे की, आता तरी मंदिरे उघडा; पण सरकारला हे ऐकूच गेले नाही. त्यामुळे हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. तसेच बार, रेस्टॉरंटमध्ये गेलेला माणूस मास्क काढून वावरतो; परंतु मंदिरामध्ये गेलेला माणूस हा मास्क काढणारच नाही आहे. त्यामुळे मंदिरे ही कधीच सुरू व्हायला पाहिजे होती; पण ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्व जगले, अध्यात्म मांडले ते आता कुठे तरी कॉंग्रेसमय झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे काही ऐकू जात नाही आहे. “उद्धवा, अजब तुझे सरकार” हे गाणे आजच्या या प्रसंगी संयुक्तिक असल्याचे दिसते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घराबाहेर पडून भाविकांना मंदिरे उघडी करून द्यावीत, भक्तांच्या भावनांचा अंत पाहू नये, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी गणेशाची आरती करून उद्धव सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले. नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीश साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी मंदिरे उघडा याबाबतच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER