स्वॅबची संख्या कमी करू नका – अमित देशमुख यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना

Amit Deshmukh

औरंगाबाद : सध्या आरोग्याच्या बाबतीत निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे घाटीच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला १० काेटींचा निधी दिला जाईल तसेच पदमान्यतेला कुठलीही अडचण येणार नाही, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. एमसीएच विंगला मान्यता देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. शहरात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने स्वॅबची संख्या अजिबात कमी न करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री अब्दुल सत्तार यांनीही स्वॅबची संख्या कमी करणे चुकीचे असून ती वाढवण्याची गरज असल्याची सूचना केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घ्या. पारिचारक, वॉर्डबॉय यांचे वेतन वेळेवर करण्याबाबत दक्षता घ्या. रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशनावरही भर द्यावा,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.

देशमुख म्हणाले की, सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. कमी कालावधीत आपण राज्यात ८५ चाचणी केंद्रे सुरू केली लवकरच ही संख्या शंभरवर पोहोचेल. सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर शासनाने भर दिला असून खासगी रुग्णालये, आरोग्य संस्था, तज्ञ यांच्यासोबत सामंजस्य करार करून त्यांचे सहकार्यही संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत २०० खाटांचे विशेष रुग्णालय तयार होत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचे रुग्णालय यामुळे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER