ललितला मालिकेतला पहिला अनुभव नकोसा

Lalit Prabhakar

अभिनेत्यासाठी त्याचं पहिलं काम हे नेहमीच लक्षात राहणारं असतं. त्यातही सध्या छोट्या पडद्यावरची प्रसिध्दी पाहिली तर प्रत्येक कलाकार एकदा तरी आयुष्यात दैनंदिन मालिका करावी असे स्वप्न पाहत असतो आणि त्या संधीच्या शोधात असतो. पहिल्या मालिकेतील पहिली भूमिका प्रत्येकाला आवर्जून सांगावी असं त्याला वाटत असतं. पण अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याला मात्र मालिकेच्या निमित्ताने मिळालेली अभिनयाची पहिली संधी तो आजही कुणाला फारशी सांगत नाही. हे करण्यामागे ललितचं नेमकं काय कारण आहे हे खुद्द ललितनेच शेअर केलं. ज्या पहिल्या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली त्या मालिकेत तो एक बलात्कार करणारा युवक दाखवला होता. अर्थातच कलाकारासाठी प्रत्येक भूमिका ही फक्त भूमिका असते. पण पहिल्याच मालिकेत अशा प्रकारची भूमिका मी का केली हा प्रश्न आजही मला सतावत असतो असं तो सांगतो.

कल्याणमध्ये मिती चार या नाट्यसंस्थेमधून ललित प्रभाकर याच्या अभिनयाला सुरुवात झाली. ललित हा रंगभूमीवरचा अभिनेता आहे. त्याला प्रायोगिक नाटकांमधून अभिनयाची संधी मिळत गेली. मिती चार या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून ललितनेही खूप प्रायोगिक नाटकांमधून काम केलं आणि बक्षीसही मिळवली. कल्याणमध्ये ललित प्रभाकर हा प्रसिद्ध अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला तो नाटकामुळेच. दरम्यान एक पाऊल पुढे टाकावे म्हणून तो मालिकेमध्ये कुठली चांगली संधी मिळते का हे शोधत होता.

लालित सांगतो मिती चार या नाट्यसंस्थेच्यावतीने मी एका नाटकात काम करत होतो आणि त्या नाटकासाठी मला उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळाला. ते नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक आले होते त्यामध्ये काही कास्टिंग डिरेक्टर होते. थोड्याच दिवसात मला त्यांच्याकडून दैनंदिन मालिकेत दोन दिवसाचं काम असल्याची माहिती मिळाली. ही संधी मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण दैनंदिन मालिकेत काम करण्याची संधी मी शोधत होतो आणि दोन दिवस काम असले तरी यानिमित्ताने मालिकेमध्ये एन्ट्री करायला मिळते याचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. त्यामुळे माझ्या मित्रमंडळींना, नाटकातील ग्रुपला, तसेच आई-बाबांना ही गोष्ट सांगितली.

ही मालिका आधीपासून सुरू होती आणि त्यामध्ये मी नव्याने काम करणार होतो त्यामुळे ही मालिका आधीपासून बघणारे लोक भरपूर होते. जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा मला असं सांगण्यात आले की तुला कोणताही डायलॉग नाही आणि या मालिकेत आता एक बलात्काराचा सीन शूट होणार आहे. मुख्य बलात्कारी वेगळा आहे, फक्त तू त्याला सहकार्य करायचे आहे. त्यावेळी माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता त्यामुळे ती भूमिका मी केली. पण एपिसोड रिलीज झाला तेव्हा मला असं करायला नको होतं असं वाटत होतं.

माझ्या नाटकातल्या मित्रांनी मला समजावून सांगितलं की अरे कुठल्याही कलाकारासाठी भूमिका हे त्याचे काम असते. त्यामुळे ती भूमिका काय आहे यापेक्षा ती तू कशा पद्धतीने करतोस याचा विचार कर आणि भविष्यातही नेहमी याच दृष्टिकोनातून काम कर. मित्रांची गोष्ट मला पटत असली तरी बरेच दिवस माझ्या मनात तोच विचार घोळत होता. त्यामुळेच कुठलीही भूमिका काय आहे हे जोपर्यंत मला स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही की मी पुढच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये काम करणार आहे.

ललित प्रभाकर याचा मालिकेतील हा अनुभव जरी वेगळा असला तरी जुळून येती रेशीम गाठी या मालिकेत तो पहिल्यांदा नायक म्हणून छोट्या पडद्यावर झळकला. या मालिकेत आदित्यची भूमिका त्याने त्याच्या अभिनयाने लोकप्रिय केली. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतही ललित दिसला होता. सतत वेगळे काहीतरी करण्याचा ध्यास असलेल्या अभिनेत्यांमध्ये ललित प्रभाकरचे नाव घेतलं जातं. हम्पी, चिसौंका हे दोन्ही सिनेमे त्याचे खूप वेगळ्या धाटणीचे सिनेमे होते. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये म्हणूनच एक वेगळ्या प्रकारचा चोखंदळपणा ललितमध्ये का आहे या प्रश्नाचे उत्तर कुठेतरी त्याच्या या पहिल्यावहिल्या भूमिकेशी जोडले गेले आहे असं तो नेहमी सांगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER