माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका

अमृताने दिला अनुभवाचा सल्ला

Amruta Dhongade

तुमचे क्रेडिट कार्ड रिन्यू करायचे आहे, त्यासाठी डिटेल्स द्या. मोबाईलवर आलेला क्यूआर कोड स्कॅन करा म्हणजे तुमचे बंद एटीएम कार्ड सुरू होईल. यासारख्या कित्येक क्लुप्त्या काढून हॅकर्स सर्वसामान्यांना आर्थिक गंडा घालत आहेत. गेल्या काही दिवसांत हॅकर्सने आपला मोर्चा कलाकारांकडे वळवला असून फेसबुक, इन्स्टा, ट्विटर ही अकाउंट्स  हॅक केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये आता ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेची नायिका सुमन अर्थात अमृता धोंगडे (Amruta Dhongade) हिच्या इन्स्टा अकाउंटचा  ताबा हॅकरने घेतला आहे. केवळ तिचे इन्स्टा पेजच हॅक केले नसून तिच्याकडे पैशांचीही मागणी केली असल्याची तक्रार अमृताने केली आहे. अमृता वेळीच सावध झाली आणि तिने कोल्हापूर सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करून याबाबतची माहिती पोस्ट केली. यासोबतच कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे सांगत हॅकरच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी अमृताने कोल्हापूर सायबर क्राइम ब्रँचकडे सोपवली आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेचे शूटिंग सध्या कोल्हापुरातील पन्हाळा येथे सुरू असल्याने मालिकेचे संपूर्ण युनिट
कोल्हापुरात वास्तव्यास आहे.

अमृतासह सर्व कलाकारांच्या राहण्याची सोय कोल्हापुरात केली असून शूटिंगसाठी सगळी टीम पन्हाळ्यात जाते. मंगळवारी अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर क्राइमकडे तक्रार केली. अमृताला एक मेल आला, ज्यामध्ये इन्स्टा अकाउंट अपडेट करावे असे म्हटले होते. त्यानुसार तिने अपडेट केल्यानंतर तिला हॅकरचा फोन आला आणि पैशाची मागणी करण्यात आली. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, अशी कळकळीची विनंतीही तिने केली आहे. सध्या प्रत्येक कलाकार इन्स्टासह फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह  असतो. अमृताही सतत सोशल मीडियावर फोटो, अपडेट तसेच मालिकेतील काही सीनचे फुटेज, किस्से शेअर करत असते.

गेल्या वर्षी ही मालिका ऑन एअर आल्यापासून अमृताने मालिकेत साकारलेल्या सुमी या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. एक खानावळ चालवणारी साधी मुलगी राजकीय वातावरण असलेल्या घरात सून बनून येते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या समरसोबत तिचा संसार सुरू होतो. असे कथानक असलेल्या या मालिकेतील सुमीचे पात्र अमृताने रंगवले आहे. मिरव मिरव मिरवणार…सगळ्यांची जिरवणार- हा तिचा या मालिकेतील टायटल ट्रॅकही लोकप्रिय झाला. मालिका लोकप्रिय होत असल्याने अमृताच्या फॅन फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झाली आहे. इन्स्टावर तिचे सध्या ८० हजारांवर फॉलोअर्स आहेत. अमृताच्या नावाने तिच्या पेजवरून संवाद साधत अनेकांना गंडा घालण्यासाठी या हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे ओळखून अमृताने फेसबुक पेजवरून तिच्या फेसबुक फ्रेंड आणि चाहत्यांपर्यंत नेमका प्रकार तातडीने पोहचवला. अमृताने तिच्या फेसबुकवर माहिती देताना लिहिलेय की, ज्या नंबरवरून तिला मेसेज आला तो तुर्कीवरून आल्याचं दिसलं.

इन्स्टाच्या व्हेरिफिकेशनसाठी युजरनेम आणि पासवर्डची मागणी तिला मेसेजमध्ये केली. अमृताने चुकून ही माहिती दिली आणि मग त्यानंतर सगळंच बिघडलं. जेव्हा हॅकरने फोन करून तिला अकाउंट त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले तेव्हा अमृताच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिने कोल्हापूर पोलिसांकडे धाव घेतली. ४० हजार रुपयांची मागणीही केली. या प्रकारावरून अमृताला धक्का बसला आहे. आपल्याला अनेकदा हे माहीत असते की, आपला युजरनेम किंवा पासवर्ड कुणालाही देऊ नये. पण ही चूक माझ्याकडून झाली. अशी चूक कुणीही करू नका, असाही संदेश अमृताने तिच्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून दिला आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही अमृताची पहिलीच मालिका असली तरी दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मिथुन’ सिनेमात अमृताला अभिनयाची संधी मिळाली.

पण ‘मिसेस मुख्यमंत्री’मध्ये सायकलवरून गावात फिरणाऱ्या सुमीने अमृताला घराघरांत पोहचवले. अमृता एकखूप चांगली कथ्थक डान्सर आहे. डान्स क्लासमधील एका मैत्रिणीनेच अमृताला सुचवले की, तिचे लूक्स आणि डान्स करतानाचे हावभाव खूप चांगले आहेत तर तिने अभिनयात करिअर करावे. मैत्रिणीचा सल्ला ऐकूनच अमृताने ‘मिथुन’ सिनेमासाठी ऑडिशन दिली आणि तिची वर्णी लागली. त्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’तील सुमीसाठी एक गावातील साधी वाटणारी मुलगी हवी असल्याची बातमी तिला मिळाली आणि तिचा लूक सुमीसाठी परफेक्ट ठरला. एकीकडे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अमृताला याच प्रसिद्धीमुळे इन्स्टा अकाउंट हॅक होण्याचा फटका बसला. पण यातून तिने नक्कीच बोध घेतला आहे आणि तुम्हीही बोध घ्या, असा अनुभवाचा सल्लाही दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER