सोशल मीडियावरील हितचिंतकांना नाहक गुन्हे नोदवून छळू नका

Supreme Court - Social Media - Maharashtra Today
Supreme Court - Social Media - Maharashtra Today

नवी दिल्ली :- कोरोना महामारीच्या सध्याच्या संकटकाळात आप्तजनांसाठी मदत मागण्याचे व गरजूंना मदत आणि दिलासा देण्याचे समाज माध्यमे हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये अश प्रकारचे संदेश टाकणाऱ्यांवर अफवा पसरवून समाजात भीती पसरविल्याचे गुन्हे नोंदवून त्यांना निष्कारण त्रास देण्याचा कोणताही प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्व राज्यांच्या पोलिसांना बजावले आहे. समाजमाध्यमांवरील हितचिंतकांच्या मागे असा ससेमिरा लावल्याचे निदर्शनास आल्यास तो न्यायालयीन अवमान मानून संबंधितांना त्यासाठी दंडित केले जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे.

कोरोना (Corona) संबंधी स्वत:हून सुनावणीस घेतलेल्या प्रकरणात न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. पोलीस दलात सर्व पातळीवर या आदेशाचे कसोशीने पालन केले जाईल याची खात्री राज्याच्या पोलीस महासंचालकांनी करावी, असे न्यायालयाने म्हटले.

सध्याच्या अडचणीच्या काळात आपल्या प्रियजनांच्या मदतीसाठी समाजमाध्यमांचा वापर करणाºयांच्या त्रासात सरकारी यंत्रणेने असे गुन्हे नोंदवून आणखी भर घालू नये, असे नमूद करून समाजमाध्यमांत या विषयावर विचारांची देवाणघेवाण होणे का गरजेचे आहे, याची न्यायालयाने दोन कारणे दिली.

पहिले कारण असे की, माहितीची मोकळेपणाने देवाणघेवाण हेच अशा आपत्तींवर मात करण्याचे महत्वाचे साधन आहे. न्यायालयाने या संदर्भात महाराष्ट्रातील १९७२ च्या भीषण दुष्काळाचा दाखला दिला. त्या दुष्काळाची दाहकता लोकांपुढे मोकळेपणाने आणि सातत्याने मांडली गेली म्हणूनच तो दुष्काळ १९४३ मधील बंगाल प्रांतातील दुष्काळासारखी लाखो लोकांचा प्राण घेणारी महाआपत्ती ठरण्याचे टळले होते. त्यामुळे अशी माहिती दडपण्याचे आपत्तीचे स्वरूप आणखी भीषण होऊ शकते.

दुसरे कारण देताना न्यायालयाने म्हटले की, अशा आपत्तीच्या वेळी सर्व बाजूंनी चर्चा झाली की त्या घटनेच्या आठवणी समाजमनात घट्ट रुजतातव या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतात. पूर्वी झालेल्या चूका अशा सार्वजनिक स्मृतीने टाळता येऊ शकतात. सन १९१८ च्या ‘स्पॅनिश फ्ल्यू’च्या महामारीच्या आठवणी जगभरात आजही अशीच पद्धतीने ताज्या राहिल्या आहेत. त्या महामारीने जगातील प्रत्येक तिसºया व्यक्तीमागील एक व्यक्ती आजारी पडली होती व पाच ते १० कोटी लोक मरण पावले होते.

अजित गोगटे

ही बातमी पण वाचा : केंद्राचे कोरोना लसीकरण धोरण सार्वजनिक आरोग्याच्या हिताचे नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button