सोशल मीडियातील टीकेवरून लोकांना नाहक त्रास देऊ नका

नवी दिल्ली: सत्ताधाऱ्यांवर वाजवी व संयत टीका करणे हा नागरिकांचा अधिकार आहे व तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे समाजमाध्यमांत अशी टीका केली म्हणून देशाच्या एका टोकाला राहणाऱ्या नागरिकास तपासासाठी देशाच्या दुसऱ्या  टोकाला यायला लावून त्रास देणे पोलिसांनी बंद करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने (SC) बजावले. भारत हा लोकशाहीवादी स्वतंत्र देश आहे व तो तसाच राहू द्यायला हवा. आम्ही येथे  सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी बसलो आहोत. त्यामुळे पोलिसांकडून असा त्रास देऊन नागरिकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केली जात असेल तर मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असेही न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने निक्षून सांगितले. कोलकाता  शहराच्या राजा बाजार भागात, कोरोना निर्बंध धाब्यावर बसवून, हजारो नागरिकांची दुर्गापूजेच्या खरेदीनिमित्त झुंबड उडाल्याची दृश्ये समाजमाध्यमांत व्हायरल झाली होती.

त्यावरून दिल्लीतील एक रहिवासी रोशनी बिस्वास यांनी प. बंगाल सरकारच्या ढिसाळ आाणि हलगर्जी कारभारावर टीका करणारी पोस्ट फेसबूकवर टाकली होती. त्यावरून कोलकाता पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध, समाजात तेढ व वैमनस्य वाडविण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा नोंदविला होता. एवढेच नव्हे तर जबाब नोंदविण्यासाठी कोलकात्याला येण्याचे समन्सही बजावले होते. याविरुद्ध रोशनी बिस्वास यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या वर्तनावर वरीलप्रमाणे नाराजी व्यक्त केली. बिस्वास यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले की, मुळात या फेसबूक पोस्टमध्ये गुन्हा नोंदविण्यासारखे काही नाही. पण पोलीस मुद्दाम त्रास देण्यासाठी जबाबासाठी कोलकात्याला येण्याचा तगादा लावत आहेत. प. बंगाल सरकारतर्फे ज्येष्ठ वकील आर.

बसंत असे म्हणाले की, त्यांनी कोलकात्याला यावे. आम्ही त्यांचा फक्त जबाब घेऊ. त्यांना अटक करणार नाही. यावर न्या. चंद्रजूड त्यांना म्हणाले, हे तुमचे वागणे म्हणजे सरकारवर टीका करणाऱ्या नागरिकास अद्दल घडविण्यासारखे आहे. तुम्ही बिस्वास यांना दिल्लीहून कोलकात्याला यायला न लावता प्रश्नावली पाठवून किंवा ई-मेल पाठवूनही त्यांच्याकडून हवी ती माहिती घेऊ शकता. पण तुम्ही तसे न करता केवळ त्रास देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कोलकात्याला यायला सांगत आहात. न्या. चंद्रचूड असेही म्हणाले की, पोलिसांना असे करू दिले तर उद्या कोलकाता, मुंबई, मणिपूर, चेन्नई अशा दूरवरच्या ठिकाणचे पोलीसही देशाच्या दुसऱ्या टोकाकडील लोकांना असेच बोलावतील.

यातून ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे का, मग हे सोसावे लागेल’ असा भीतिदायक संदेश समाजात जाईल. शेवटी अ‍ॅड. बसंत यांनी बिस्वास यांना कोलकात्याला यायला न लावता कोलकाता  पोलीसच दिल्लीत येऊन त्यांचे जाबजबाब घेतील, असा मध्यमार्ग सुचविला. त्यानुसार कारवाई करण्यास सांगून याचिका निकाली काढली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER