तुम्ही राजकारणात येऊ नका…

Shailendra Paranjapeशिवाजीमहाराज जन्माला यावेत, पण ते शेजाऱ्याच्या घरी….असं एक वाक्य प्रसिद्ध आहे. थोडक्यात आपल्या मुलाबाळांनी कोणतीही जोखीम न पत्करता त्यांचं आयुष्य सुखी व्हावं, ही पालकांची अपेक्षा असते, हे या वाक्यातून ध्वनित होते. शिवाजीमहाराज असोत की समाजासाठी खस्ता खाणारे कोणत्याही काळातले लोकोत्तर व्यक्तिमत्व, त्यांना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, याची प्रचिती येतेच. पण आपल्या मुलाबाळांना ही तोशिस पडू नये, त्यांना सारं काही सहजी मिळावं, त्यांचं आयुष्य सुखाचं जावं, त्यांना विनात्रास सारं काही मिळावं, ही पालकांची अपेक्षा असते. त्यातूनच अशा म्हणी, वाक्प्रचार समाजात रूढ होताना दिसतात.

काळ कोणताही असो, आईबापांचं मन हे शेवटी मुलांचं भलंच चिंतत असतं. जुन्या काळी राजा हा प्रजेचा प्रतिपाळ करत असे. एका अर्थाने राजाच प्रजेचा मायबाप असे. राजेशाहीचा काळ जाऊन लोकशाही आली आणि आपण सरकारला मायबाप सरकार असं संबोधू लागलो. लोकशाहीतल्या सरकारनंही प्रजेची काळजी घ्यायला हवी, अशी अनेकांची अपेक्षा असते. ती काही प्रमाणात रास्तही आहे. पण खरोखर सरकार किंवा त्यात राज्य करणारे राज्यकर्ते आपलं म्हणजे प्रजेचं भलं करतात का, हा खरा प्रश्न आहे.

मराठीमधे `यथा राजा तथा प्रजा’, `गाव करी ते राव न करी’, अशा काही म्हणी आहेत. इंग्रजीत `पीपल गेट रूलर्स दे डिझर्व’, अशी म्हण आहे. लोक भ्रष्ट म्हणून सरकार किंवा राजकारणी भ्रष्ट, हे खरे आहे की सर्वोच्च नेते भ्रष्ट म्हणून लोक भ्रष्ट आहेत, हा खूप मोठा चर्चाविषय होऊ शकतो. त्याचं उत्तर तुम्ही `यथा राजा तथा प्रजा’वर विश्वास ठेवता की `पीपल गेट रूलर्स दे डिझर्व’ मानता, यावर ठरेल. पण कसंही असलं तरी भ्रष्टाचार कमी व्हायला हवा, याबद्दल कुणाचंच दुमत नसणार.

हे सारं मनात यायचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं एक ताजं विधान. `राजकारणात येऊ नका’, असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचं वृत्त प्रसारित झालंय. ते सांगताना पवार म्हणाले, `मी राजकारणात पडलो आणि अडकलो. आता बाहेरही पडता येत नाही. तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका. राजकारणापेक्षा प्रशासकीय सेवा किंवा स्वतःच्या व्यवसायाचा विचार करा.`

गुणवत्तावान विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी अजित पवार यांनी हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेय. त्यामुळेच शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी, या वाक्याची आठवण आली. कारण अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी पवार यांनी पार्थला राजकारणात जाऊ नकोस, हे मार्गदर्शन नक्कीच केले नसणार. केले असले तर त्यांचा मुलगाच त्यांचा सल्ला मनावर घेत नाही, असाही अर्थ निघतो.

पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय तीव्र स्वरूपाची होती. पार्थ यांच्या मताला मी काडीची किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांनी इतरांच्या मुलांना राजकारणात येऊ नका, असा सल्ला दिलेला आहे. तो त्यांच्या मुलाला लागू नाही. अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना सल्ला देताना हेही सांगितलं आहे की विश्वासाह्रता संपली की माणूस संपतो. पण प्रत्यक्षात तसं काही होताना दिसत नाही कारण स्वतः अजित पवार यांनीच भल्या पहाटे उठून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण त्यामुळे अजित पवार यांची विश्वासार्हता संपलेली आहे का, हा प्रश्न आहे.

राजकारण्यांचं बोलणं लोक फारसं मनावर घेत नाहीत कारण ते बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यामुळेच राजकारणात येऊ नका, हा त्यांचा सल्लाही गुणवत्तावान पुढची पिढी लक्षात घेणार नाही, अशी आशा करू या.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER