रुग्णांच्या नातेवाइकांना ‘रेमडेसिवीर’ आणण्याची सक्ती करू नका : राजेश टोपे

Rajesh Tope

जालना :- राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचारापोटी आकारण्यात येणारी देयके योग्य दरानुसार देण्यात येत नाही, असे नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. यापुढे प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी सूचना टोपे यांनी केली.

तसेच, कोरोना (Corona) रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाइकांकडून सक्तीने मागवून घेणे, हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांनी त्यांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करावी. जिल्हा प्रशासनाने त्यांना आवश्यकता असलेल्या इंजेक्शन्स मागणीनुसार पुरवठा करावीत. परंतु यापुढे कुठल्याही रुग्णांना इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नये. त्याचबरोबर, सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असतानाही दुर्लक्ष करून घरीच राहतात. बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करत त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात यावेत. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही, असे निर्देश टोपे यांनी दिले.

दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मागणीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. जालना शहरामध्ये विद्युतदाहिनी उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही टोपे यांनी दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button