
पंढरपूर : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे माघी यात्रा काळात भक्तांनी पंढरपुरात (Pandharpur) येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाने केले आहे. पोलिसांनी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना नोटीस बजावून वारकऱ्यांना मठात ठेवून घेतल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असे कळवले आहे. पण या नोटीस मिळण्याआधीच शहरातील मठ – धर्मशाळेत भक्त पोहचले आहेत. या भक्तांना हाकलू नका, अशी विंनती वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केली आहे.
शहरातील जवळपास १२०० मठ व धर्मशाळेत आलेल्या भक्तांना मठात राहू देऊ नका, अशा नोटीस पोलीस विभागाने बजावल्या आहेत. यावर वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत बंडातात्या कराडकर यांनी आक्षेप घेत जे यापूर्वीच मठात दाखल झाले आहेत, त्यांना बाहेर हाकलू नका. त्यांना संचारबंदी काळात बाहेर पडू देऊ नका. मात्र, मठ- धर्मशाळेबाहेर काढू नका, अशी विंनती केली आहे. पोलिसांनी जबरदस्ती केल्यास याला उग्र स्वरूप येईल असा इशारा त्यांनी दिला.
प्रशासनाच्या आवाहनानंतर राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या पंढरपूरकडे येण्याच्या ऐवजी जागेवरच थांबल्या आहेत. मात्र, ज्या दिंड्या – भक्त यापूर्वीच आले आहेत, त्यांना पंढरपुरात राहू द्या, असे आवाहन बंडातात्या यांनी पोलीस प्रशासनाला केले. नव्याने येणाऱ्या भक्तांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस रोखत असतील तर त्याला आक्षेप नाही. मात्र, जे आधीपासून आले आहेत त्यांना बाहेर काढल्यास उग्र आंदोलन होईल, असा इशारा बंडातात्या यांनी दिला.
पंढरपूरसह १० गावात संचारबंदी
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे माघी यात्राही भक्तांशिवाय साजरी होणार आहे. २२ फेब्रुवारी रात्री १२ पासून २३ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत २४ तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील १० गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला