‘कंपाउंडर’कडूनच औषध घेण्यास प्रोत्साहित करू नका; भातखळकरांचा शिवसेनेला टोमणा

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत जनजागृती करताना शिवसेनेच्या (Shivsena) काही नगरसेवकांनी लक्षणानुसार कोरोनाची (Corona) औषधे कधी आणि कशी घ्यावीत याची जाहिरात समाजमाध्यमांवर केली. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेणे धोकायदायक आहे, असा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने  (आयएमए) घेतला. यावरून भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला टोमणा मारला – शिवसेनेच्या नगरसेवकांनी नागरिकांना ‘कंपाउंडर’कडूनच औषध घेण्यास प्रोत्साहित करू नये!

आयएमएने आक्षेपात म्हटले आहे की – ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे. त्याची अशा रीतीने जाहिरात करणे चूक आहे. भातखळकर यांनी ट्विट केले – मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माधुरी भोईर, संजना घाडी आणि सुजाता पाटेकर या शिवसेना नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता ‘कंपाउंडर’कडून औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची जाहिरात केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. या जाहिरातीद्वारे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असून जर यात नमूद केलेली कोणतीही औषधं कोणी घेतली आणि काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असेल, असा सवालही त्यांनी केला. जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला

.शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणाऱ्या जाहिरातीत समाजमाध्यमावर कोरोनावरील लक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केलेल्या औषधांची यादी टाकली आहे. जीवनसत्त्व क, ड यांसह हायड्रोक्सीक्लोरोक्वीन  ही औषधे सर्वांनी घ्यावीत, असे म्हटले.  औषधांचे दिवस आणि प्रमाणही दिले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ‘डेक्सोना’ गोळी पाच दिवस घ्या, असे यात म्हटले आहे. ताप, सर्दी, घसादुखी असल्यास घ्यायच्या औषधांची यादीही दिली आहे.अति उत्साहात तयार केलेल्या या जाहिरातीमध्ये नमूद केलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहेत. औषधांचे प्रमाणही चूक आहे. अशा रीतीने जाहिरात केल्यास कोणत्याही सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल आणि याचे व्यापक दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधांची जाहिरात करणे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत गुन्हा असल्याने या जाहिराती मागे घेण्याची मागणी ‘आयएमए’ने केली आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह माधुरी भोईर, संजना घाडी, सुजाता पाटेकर आदी नगरसेवकांनी या प्रकारची जाहिरातबाजी केल्याची तक्रार आहे.

नगरसेवकांची सारवासारव

माझ्या वैयक्तिक साहाय्यकाने ती जाहिरात तयार करून फेसबुकवर प्रसिद्ध केली होती. माझ्या लक्षात आल्यावर जाहिरात काढून टाकली, असे माजी महापौर आणि नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. माजी महापौरांसह इतर नगरसेवकांनी केलेल्या जाहिरातींचे अनुकरण करत जाहिरात तयार केली.यात औषधांची माहिती नमूद केली असून याचा वापर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करावा, असा उद्देश नव्हता. समाजमाध्यमांवरून जाहिरात काढून टाकल्याची माहिती नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी दिली.

डॉक्टरांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही!

काही नगरसेवकांनी जाहिरातीत मोठ्या कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शन करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही टाकले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER