‘कोरोनाच्या काळात राजकारण करु नका, ते लोकांना आवडत नाही’; गडकरींनी टोचले कान

Nitin Gadkari

नागपूर : सध्याच्या कठीण काळात करोनाचा धोका वाढत असताना स्वतःची, परिवाराची आणि समाजाची जास्तीत जास्त काळजी घ्या. निष्काळजीपणा करु नका. त्याचबरोबर कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. त्यामुळे राजकारण न करता सगळ्यांना मदत करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भाजपाच्या नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना सध्याच्या परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव करुन दिली. त्याचसोबत लोकांना मदत करताना आपण स्वतःची, आपल्या परिवाराची काळजीही घ्यायला हवी असा सल्लाही दिला. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे फिरताना दिसत आहेत, अतिउत्साहीपणा करू नका. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करा. कोणाच्या घरी जाऊ नका. तुम्ही जितकं सहजपणे घेता तसं घेऊ नका. जी कामं आहेत ती घरून करा. कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात ते म्हणतात, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. राजकारण करु नका. सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड, झेंडे लावले पाहिजेत असं नाही. अशावेळी आपण जर काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. तुम्ही जे कऱणार आहात, त्याचं क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे. मीडियामुळे ते सर्वांपर्यत पोहोचतंच. त्यामुळे आपण आपल्या सेवाकामाचा लोकांना माहिती होणं इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे. त्याचा फार बागुलबुवा करणं म्हणजे एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे आणि चार जण वारंवार त्याच्यासोबत फोटो काढून पाठवत आहेत, असं करु नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button