लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अन्यथा त्याचे दुष्परिणाम कोरोनाने दाखवून दिले – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- “निसर्ग आजही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने बघतो आहे. आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे काय दुष्परिणाम काय होतात हे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे. निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन (ॲप्रोपिएट बिहेविअर) विकसित करायला हवे. असे झाले तरच आरोग्यदायी विकास होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकासकामे करताना निसर्गाची काळजी कशी घेता येईल, निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल हे सांगणारी आणि यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करा, अशी सूचना दिली. विशेष म्हणजे या संस्थेचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

रामायणात लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणावी लागली. माझ्या मते संजीवनी बुटी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे. आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहोत. त्यामुळेच जंगलाचा नाश करून विकासकामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे ते म्हणाले.

मानवी वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का, त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का? नाही; पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, या वर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असेही ते म्हणाले.

जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे. आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरेचे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशा प्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री दोन दिवसात कोकणाला मोठी मदत करणार – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button