कुणासारखे नाही, स्वतः सारखे व्हा !

कुणासारखे नाही, स्वतः सारखे व्हा

शिक्षण क्षेत्रात आज टक्केवारीने नको तितका गोंधळ घातला आहे .त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी केवळ परीक्षा पास करणे ,गुण मिळवणे ,म्हणजे शिक्षण असा गैरसमज करून घेतात .चौकटीबाहेर जाऊन आपल्या क्षमतांचा विकास करण्याची धडपड त्यांच्यात दिसत नाही.

खरं बघितलं तर आज भारताची ६० टक्के लोकसंख्या तरुण आहे. आणि हीच जगात आपली सगळ्यात मोठी ताकद आहे.२५ वर्षांपेक्षा कमी वय असलेली तरुणांची पिढी भारताचेच नव्हे तर जगाचे भवितव्य ठरविणार आहे. मग प्रश्न पडतो की कोणत्या उद्दिष्टांनी नेमकी ही तरुण मने भारलेली आहेत ?आणि स्वतःला आकार देण्याकरता ते नेमकं काय करीत आहेत?

यासंबंधी प्रसिद्ध चित्रपट कलाकार आशुतोष राणा यांची शिक्षण व्यवस्थेवर असलेली एक चांगली पोस्ट वाचनात आली. ७० च्या दशकात ,त्यांच्या वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून , तिघांनाही गाडरवारा येथील ग्रामीण विद्यालयातून काढून जबलपुर शहरातील क्राइस्टचर्च स्कूल दाखल करून दिले. त्यावेळी इंग्रजी माध्यमातील विद्यालयांमध्ये हे विद्यालय अव्वल स्थानावर होते .आई वडील त्या भावंडांना होस्टेलवर सोडून परत पुढच्या रविवारी भेटायला येण्याचे आश्वासन देऊन वापस गेले.

मुलं आपल्या आई-वडिलांकडून फक्त प्रेमाची अपेक्षा नाही करत, ते त्यांना इम्प्रेस ही करू इच्छितात. ठरल्याप्रमाणे पुढच्या रविवारी साडेतीन वाजता शाळेचा स्टॅंडर्ड हायफाय युनिफॉर्म घालून आईवडिलांची वाट पाहात बसले होते .आई वडील त्यांच्या नेहमीच्या सफेत धोतर ,कुरता आणि आईची उलट्या पदराची साडी अशा वेशामध्ये प्रवेशते झाले .आईला भेटावसं वाटत होतं तरीही शाळेच्या शिस्ती प्रमाणे तिघेही भाऊ जसे सैनिक विश्रामच्या मुद्रेत सैनिक सतर्क उभा राहतो त्या प्रमाणे उभे होते. आणि आई-वडील जवळ येताच त्यांनी “गुड इव्हिनिंग ,मम्मी ! बापुजी !” असे म्हटले. आई-वडिलांनी किंचितसे स्मित केले. मुलांना वाटलं की आई-बाबा प्रभावित झाले आहेत. संध्याकाळी ही सगळी मंडळी ॉलच्या एका कोपर्‍यात बसून बोलत असताना अचानक बाबूजींनी त्यांना आपले सामान पॅक करून गाडरवारा ला वापस चलायला सांगितलं. आणि कारण विचारताच वडील म्हणाले ,” राणाजी ! मला तुम्हाला फक्त चांगला विद्यार्थी नाही ,एक चांगला व्यक्ती बनलेला बघायचं आहे. नवीन शिकताना ,जून विसरायला शिकवायचे नाही .विद्या व्यक्तीला संवेदनशील बनवण्यासाठी असते संवेदनाहीन बनवण्यासाठी नाही .ती व्यक्तीच्या जवळ जाण्याची कला शिकविते .आपल्याशी जोडलेल्या पासून दूर करण्याचे नाही .संवेदनाहीन साक्षर होण्यापेक्षा संवेदनशील निरक्षर होणे खूप चांगले!”

त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी आशीर्वाद देताना ,नेहमी “कुणा सारखे नाही, स्वतःच्या सारखे व्हा” असाच आशीर्वाद दिला. श्री.आशुतोष राणा म्हणतात ,”त्या दिवशी मला “विद्यालय” आणि “स्कूल” मधील अंतर समजले.”

खरे शिक्षण म्हणजे काय या संबंधी वेगवेगळ्या या मोठ्या लोकांची अनेक मतं, विचार आपल्याला बघायला मिळतात. ते तरुण पिढीला मार्गदर्शक ठरू शकतात. शिक्षण म्हणजे नेमके काय याची गाईडलाईन तिथून मिळते.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न प्रो. सी .एन. आर राव हे डॉक्टर रघुनाथ मसलेकर यांचे गुरु होते. माशेलकरांना संशोधनाकरिता अनेक जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळाले आहेत .कोणताही सन्मान मिळाला की ते गुरूंना दाखवायला जात असत .प्रो. राव फक्त ,”नॉट बॅड”. असे दोन शब्द म्हणत आणि कामाला लागत ,त्यांना पुढे रॉयल सोसायटी ची फेलोशिप जो फार मोठा सन्मान समजला जातो तो मिळाल्यावरही ,माशेलकर हे त्यांना दाखवायला गेले .तेव्हाही त्यांनी “नॉट बॅड “असेच म्हटले. शेवटी ,”मी काय केले म्हणजे तुम्हाला कौतुक वाटेल ?”असे त्यांनी गुरूंना विचारतात प्रोफेसर राव म्हणाले,” सर्वोत्तमता, उत्कृष्टता यांची शिर्डी अमर्याद असते .त्यावर तुम्ही चालतच राहायचं असतं. रोज नवे नवे पराक्रम करत ही शिडी चढतच राहायची असते .कधीतरी ते सर्वोत्तम तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असं तुम्हाला गवसतं !” त्या दिवशी माशेलकर म्हणतात,” मला जीवनातला एक महत्त्वाचा धडा मिळाला “आणि त्यांनी तरुणांना आवाहन केलं की ,”तरुणांनो तुमच्या प्रत्येकाकडे प्रचंड क्षमता आहे, क्षमता ताणून त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा.!”

फ्रेंड्स ! आपण फक्त आपल्या प्राचीन विज्ञानाचा अभिमान बाळगतो .आजचे सगळे शोध पूर्वीच लावून गेले आहेत अशा थाटात आपण बोलत असतो. पण केवळ पूर्वजांचे गोडवे गायल्याने क्षमता निर्माण होत नाही, तर भूतकाळाची प्रेरणा घेऊन वर्तमान काळ कठोरपणे घडवावा लागतो. आणि तो केवळ स्वप्न बघून होत नाही ,तर आपण कुठे कमी पडलो ?याचा शोध घेऊन उणिवा दूर केल्या तरच ते प्रयत्नांनी साध्य होऊ शकते. मग आपला तरुण कमी पडतो कुठे ?

काही दिवसांपुर्वी एका मोठ्या कंपनीचे सीईओ यांचे विचार ऐकायला मिळाले. ते म्हणाले ,”फक्त ७ % इंजिनियर्स सक्षम असतात. नोकरी करता येणारा तरुण नेमका कुठे कमी पडतो, तर त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात. तांत्रिक माहिती सखोल नसते .प्रॅक्टिकल नॉलेज कमी असते. ग्राहकांना आवश्यक असलेल्या संवाद कौशल्य नसतं. तांत्रिक समस्या, प्रश्न निर्माण झाले तर ज्ञानाचा उपयोग करून ते सोडवता येत नाहीत .आपल्या क्षेत्रातली माहिती अद्ययावत नसते.

हे बघितल्यानंतर असं वाटतं की की आपली मनोवृत्ती ही याला कारणीभूत आहे .हे केवळ शिक्षण पद्धतीची संबंधित प्रश्न नाही .म्हणूनच तरुणांनी स्वतःपासूनच बदलाला सुरुवात करायला हवी. लाइफ स्किल्स शिकण्यावर भर द्यायला पाहिजे.

यामध्ये शिक्षकांचाही फार मोठा हातभार असतो .कोणत्याही राष्ट्राची उंची त्या देशातल्या शिक्षकांच्या सरासरी उंचीपेक्षा जास्त असू शकत नाही अशा अर्थाची एक म्हण आहे. विवेकानंद मुंबईला असताना एक तरुण त्यांना भेटायला गेला .तो शिक्षक असल्याचा परिचय त्याने करून दिला होता. वार्तालाप झाल्यानंतर जाताना तो स्वामीजींना म्हणाला,” मला काही संदेश द्या “स्वामीजी त्याला म्हणाले,” जितक्या लवकर शक्य होईल , तितक्या लवकर ही नोकरी सोडून दुसरी एखादी नोकरी किंवा उद्योग पहा “. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला .स्वामीची पुढे म्हणाले ,” If one does the work of teaching for a long time,he gets blunt in intulect.”मर्यादित ज्ञानाचा दीर्घकाळ उपयोग केला तर माणूस बुद्धी मंद होतो ,नव्या ज्ञानाची- नाविन्याची नोंद घेतली नाही तर बुद्धीक्षीणता वाढीस लागते.

अगदी थोड्या वेळातच त्या शिक्षकांची पात्रता त्यांनी ओळखली होती .त्याचे शिक्षक म्हणून कायम राहणे विद्यार्थ्यांवर अन्याय करत ठरले असते .ही घटना शिक्षकांच्या डोळ्यात पाणी अंजन घालणारी आहे. म्हणूनच विनोबाजी म्हणतात ,जो शोध घेतो तो शिक्षक ! शिक्षणाची जबाबदारी त्यानेच अंगावर घ्यायची आणि शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाची कारणे व त्याची उत्तरेही त्यांनीच शोधायची असतात.

हजारो छोट्या वर्ग खोल्यांमध्ये राष्ट्र सामावलेले असते .आणि तेथे शिक्षक नावाचा एक नायक वावरत असतो. तो काय करतो ? तेथे काय चालते ? यावर भावी भारताचे भवितव्य अवलंबून आहे.

जागतिक तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा त्याने बदलून टाकला तो जगप्रसिद्ध माणूस म्हणजे एप्पल कंपनीचा सहसंस्थापक स्टीव जॉब्स! त्याच्यामुळेच सामान्य माणसाच्या हातात संगणका आला, टच स्क्रीन असलेला पहिला आयफोन ,पहिला आयपॉड ,पहिला टॅबलेट या तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडणाऱ्या गोष्टी घडल्या .त्याने बनवलेल्या संगणकाचा वापर करून बनवण्यात आलेली पहिली ॲनिमेशन फिल्म त्याच्या पिक्सार कंपनी तयार झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी चार हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचा तो सीईओ होता. खरंतर घरची कुठलीही परिस्थिती त्याला अनुकूल नव्हती तो म्हणतो,” मी जे काही केले ते आवडीने प्रेमाने केले .तुम्हाला तुमची आवड कशात आहे हे शोधले पाहिजे .तुमचे काम हे तुमच्या जीवनातील मोठा भाग व्यापून टाकते आणि खरे समाधान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आवडीचे काम करीत राहणे .श्रेष्ठ काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जे कराल त्या कामावर श्रद्धा ठेवणे आणि प्रेम करणे. कुठलेही क्षेत्र घ्या ,वरवर पाहता ते खूप सोपे वाटते .पण जसजसे तुम्ही खोलामध्ये जातात ,तसे तुम्हाला तेथे अनंत अडचणी आहे जाणवते . आणि म्हणूनच त्या कामाविषयी प्रेम आणि उत्कटता हवी. अवघ्या 56 व्या वर्षी निर्भयपणे मृत्यूला सामोरे जाताना त्याने तरुणांना संदेश दिला होता ,”स्टे हंग्री’ स्टे फूलिश “ज्ञानाची शिकण्याची संशोधनाची नवनिर्मितीची भुक कायम ठेवा! कधीही थांबू नका!! वेडे व्हा !!! लोकांनी मूर्ख म्हणलं तरी चालेल. शिक्षण कसं घ्यावं हे सांगणारी यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट नसणार!

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER