यंदाचे शैक्षणिक वेळापत्रक तूर्त जाहीर करू नका; सुप्रीम कोर्टाचे विद्यापीठ आयोगास निर्देश

Supreme Court - UGC

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) (UGC) घेतली जात असलेली ‘कम्पार्टमेंट’ परीक्षा देत असलेल्या देशभरातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या लाखो विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेशाची संधी हुकून त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालये व विद्यापीठांचे यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक तूर्त जाहीर करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

‘सीबीएसई’ने (CBSE) पर्यायी मूल्यांकन पद्धतीने इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र ज्यांनी तो पर्याय स्वीकारला नाही अशा विद्यार्थ्यांची ‘कम्पार्टमेंट’ परीक्षा देशभरातील १,२७८ केंद्रांवर आजपासून सुरू झाली असून ती २९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. इयत्ता १० वीचे १.५० लाखांहून थोडे अधिक तर इयत्ता १२ वीचे ८७, ६५१ विद्यार्थी या परीक्षा देत आहेत.

या परीक्षांचे निकाल लागण्यापूर्वीच महाविद्यालयांचे प्रवेश सुरू होऊन संपले तर प्रवेशाची संधी गमावून संपूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशांचे वेळापत्रक पुढे ढकलावे यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

‘यूजीसी’च्या वकिलाने सांगितले की, नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक तयार झाले असून खरे तर ते गेल्या रविवारीच जाहीर केले जायचे होते. त्यानुसार महाविद्यालयीन प्रवेश येत्या आॅक्टोबरअखेर पूर्ण करण्याची योजना आहे. हे ऐकून न्या. खानविकर त्या वकिलास म्हणाले की, यंदा निर्माण झालेली खास परिस्थिती पाहता या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जरा सोय करायला हवी. दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर थोडक्यासाठी वादित होऊ दिले जाऊ शकत नाही. ‘सीबीएसई’ने त्यांच्या सध्या सुरू असलेल्या ‘कम्पार्टमेंट’ परीक्षांचे निकाल आॅक्टोबरअखेर लावले तर महाविद्यालयांचे प्रवेश त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकतात.

‘सीबीएसई’च्या वकिलाने सांगितले की, ‘कम्पार्टमेंट’ परीक्षांच्या उत्तरपत्रिका १५ क्षेत्रीय केंद्रांमध्ये तपासल्या जायच्या असल्याने परीक्षा उरकल्यावरही निकाल लावण्यास आॅक्टोबरचा शेवट उजाडेल. यावर न्यायालयाने ‘सीबीएसई’ व ‘यूजीसी’ या दोघांनाही समन्वयाने काम करण्याची सूचना केली. न्यायालयाने पुढील सुनावणी येत्या २४ सप्टेंबर रोजी ठेवली व तोपर्यंत ‘यूजीसी’ने महाविद्यालये व विद्यापीठांचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करू नये, असे निदेश दिले. ‘सीबीएसई’ने ‘कम्पार्टमेंट’ परीक्षांचे निकाल केव्हापर्यंत लावणे शक्य होईल ते कळवावे म्हणजे त्यानुसार नवे शैक्षणिक वर्ष थोडेफार मागेपुढे करण्यावर विचार करता येईल, असे न्यायाधीश म्हणाले.

वेळ थोडा असल्याने ‘कम्पार्टमेंट’ परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना, निकालाच्या अधीन राहून हंगामी प्रवेश देण्याचे तरी निर्देश विद्यापीठांना द्यावेत, अशी सूचना याचिकाकर्त्यांना गेल्या तारखेला केली होती. परंतु त्यातील अडचण स्पष्ट करताना न्या. खानविलकर यांनी सांगितले होते की, या परीक्षांना पर्सेंटाइल पद्धतीने गुण देण्यात येत नसल्याने हंगामी प्रवेश देणे अडचणीचे होईल; शिवाय देशभरातील शेकडो विद्यापीठांना प्रतिवादी करून नोटिसा काढून त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER