डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान ‘एअर फोर्स वन’ आहे उडता महाल

Donald Trump Air Force One

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही तासांत भारतात दाखल होतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात त्यांच्या ताफ्यातील मोटारी, विमाने हे चर्चेचा विषय असतात. डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या चालत्या-फिरत्या व्हाइट हाऊस म्हणजे ‘एअर फोर्स वन’मध्ये आहेत. आकार, सोई आणि या विमानाचे वैशिष्ट्य पाहता हा सर्व सोईंनी युक्त उडता महाल आहे, असे म्हणता येईल.

या बोईंग ७४७-२०० बी सीरीज प्रचंड विमानात चार हजार चौरस फूट जागा आहे. यात तीन मजले असून ट्रम्प यांच्यासाठी खास सूट आहे. एक मोठे ऑफिस आणि कॉन्फरन्स रूम आहे. विमानात १०० लोकांचा स्वयंपाक करण्याची सोय आहे. या विमानात २६ विमान कर्मचाऱ्यांसह १०२ लोक प्रवास करू शकतात. विमानात नेहमी एक डॉक्टर असतो.

हे विमान काही मिनिटांत उड्डाणासाठी सज्ज असते. हे विमान म्हणजे उडते मिनी व्हाइट हाऊसच आहे. विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातल्या कुठल्याही भागात संपर्क साधू शकतात. अमेरिकेवर हल्ला झाल्यास मोबाईल कमांड सेंटरसारखा या विमानाचा वापर करू शकतात. हे विमान कधी एकटे उड्डाण करत नाही. काही कार्गो विमाने नेहमी त्याच्या मागे-पुढे असतात. ट्रम्प यांना कुठल्याही वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी ही कार्गो विमाने सोबत असतात.

हवेतही इंधन भरता येते

या विमानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपातकालीन किंवा प्रतिकूल स्थितीत या विमानामध्ये हवेतच इंधन भरण्याची सोय आहे.

इलेक्ट्रो मॅग्नेटिक प्लसचा परिणाम होत नाही

एअरफोर्स वन अत्याधुनिक आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिमने सुसज्ज आहे. या विमानातील इलेक्ट्रॉनिकच्या उपकरणांवर इलेक्ट्रो मॅग्नेटिक प्लसचा परिणाम होत नाही. त्यामुळे ती बंद पडत नाहीत.

वेग प्रतितास १०१३ कि. मी.

एअरफोर्स वन ३५ हजार फूट उंचीवर १०१३ किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकते. ४१,१०० फूट उंचीवरून उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. याचा प्रतितास उड्डाणाचा खर्च १ कोटी ३० लाख रुपये आहे.