डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात 36 तासांचा मुक्काम, मोदींसोबत विविध मुद्दांवर चर्चा

Donald Trump,PM Modi

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा भारताच्या दौ-यावर येत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प हे 36 तास भारतात थांबणार असून त्यांच्या समवेत अमेरिकेचे शिष्टमंडळही असणार आहेत. त्यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंगला यांनी म्हटले आहे.

ट्रम्प अहमदाबादेत पोहोचतील. रोड शो केल्यानंतर ते मोटेरा स्टेडियमवर पोहोचतील. येथे आयोजित एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प संबोधित करतील. ‘हाउडी मोदी’च्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांसंह दोन्ही राष्ट्रांच्या बाबतीत महत्वपूर्ण मुद्दांवर मोदी आणि ट्रम्प यांच्यादम्यान चर्चा होईल. दोघेही सोबतच लंच घेतील.

खुद्द ट्रम्प यांनी सांगितले होते की,नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात मागील 8 महिन्यांतील ही पाचवी भेट असणार आहे. मात्र, भारतासोबत ट्रेड डील करण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताला मोठा झटका दिला होता. मात्र यावेळी अमेरिका लवकरच भारताशी ट्रेड डील करेल, अशी अपेक्षा मोदी सरकारला आहे.

यात ते अहमदबादलाही भेट देणार असून पंतप्रधान मोदींसोबत जाहीर भाषणही करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा विदेश दौऱ्यांवर असतात तेव्हा ते एका खास विमानाने प्रवास करतात. एअर फोर्स वन असे त्या विमानाचे नाव असून ते जगातील सर्वात शक्तिशाली विमान असल्याचे समजले जाते. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि तेवढ्याच तोडीची सुरक्षा व्यवस्था असलेले हे विमान कायम जगभर कुतुहलाचा विषय ठरले आहे.

बोईंग 747-200बी श्रेणीचे हे विमान असून त्यावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे लिहिलेले आहे. जगात कुठल्याही हवामानात उतरण्याची या विमानाची क्षमता आहे. त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही त्याची क्षमता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्राला परतवून लावण्याची व्यवस्था असून संभाव्य धोक्याची कल्पना देण्याची अत्यंत आधुनिक रडार यंत्रणाही त्यावर बसविण्यात आलीय.

विमानात अध्यक्षांसाठी अलिशान ऑफिस, काही खोल्या आहेत. तब्बल 4 हजार स्क्वेअरफुट जागा वापरासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीही बसण्याची खास व्यवस्था आहे. आणीबाणीच्या काळात याच ऑफिसचा उपयोग वॉर रुम म्हणून करण्याचीही सोय आहे.

विमानात खास सर्जरी रुम असून त्यात कायम दोन डॉक्टर्स तैनात असतात. त्याचबरोबर विमानात दोन किचन्स असून त्यात प्रत्येकी 100 जणांचा स्वयंपाक तयार करता येतो. या विमानात किमान 400 जण एकाच वेळी प्रवास करू शकतात.