कोरोनाच्या लढाईत ट्रम्प यांनी मागितली मोदींची मदत

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या वाढत्या मृत्युसंख्येमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इटली, स्पेन, अमेरिका, चीन यासारखे आर्थिक विकसित देशही या विषाणूमुळे हैराण झाले आहेत. अमेरिकेत प्रत्येक दिवशी कोरोना विषाणूमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत सध्या तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली असून आतापर्यंत आठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेची मदार आता भारतावर असणार आहे. शनिवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत कोरोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली आहे.

भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरलं होतं. भारतात आजही अनेक लोकांना मलेरिया हा आजार होत असतो, यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करत असतात. हेच औषध सध्याच्या घडीला कोरोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. हे औषध अमेरिकेलाही उपलब्ध व्हावं यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. मात्र कच्च्या मालाच्या अभावापोटी भारतातही या औषधाचं उत्पादन कमी झालेलं आहे. सध्या जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे भारतातील औषध कंपन्यांनी या औषधासाठीचा कच्चा मालक एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्याशी बातचीत केली. यावेळी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासक बोलसोनारो यांनी दिलं.