कॅपिटल भवनाबाहेर ट्रम्प समर्थकांचा अभूतपूर्व गोंधळ, गोळीबारात महिलेचा मृत्यू

US Capitol Building

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत (Capitol Building) घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला

नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले जो बायडेन यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. “मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं”, असं बायडेन म्हणाले.

निवडणुकीच्या निकालांनंतर अमेरिकेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीपूर्वीच ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल भवनसमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्ये झटापटही झाली. या हिंसाचारात गोळी लागून एका महिलेचा मृत्यूही झाला, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे. तसेच, नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा सुद्धा ट्विटरने दिला. वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे, असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER