पहिले दोन सेट गमावूनही थिएमने जिंकली युएस ओपन स्पर्धा

Dominic Thiem

आधी तीन वेळा अंतिम फेरीत हरलेला ऑस्ट्रियाचा (Austria) डॉमिनिक थिएम (Dominic Thiem) उपांत्य सामना जिंकल्यानंतर म्हणाला होता, मी पुढचा सामना जिंकलो तर ते माझे पहिले यश असेल आणि हरलो तर अँडी मरेला विचारेन की 0-4 झाल्यावर कसे वाटते? पण अँडी मरेला विचारायची वेळ त्याने येऊ दिली नाही.

युएस ओपन 2020 (US Open Tennis) च्या विलक्षण अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावूनसुध्दा त्याने जर्मनीच्या (Germany) अॕलेक्झांडर झ्वेरेव्हचे (Alexander Zverev) विजेतेपदाचे स्वप्न उधळून लावले. थिएमने अंतिम सामना पाचव्या सेटच्या टायब्रेकरमध्ये जिंकताना 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 (8-6) असा विजय मिळवला आणि तब्बल 71 वर्षात कुणी युएस ओपन टेनिस स्पर्धा दोन सेटच्या पिछाडीवरुन जिंकण्याचा इतिहास घडला.

चार तास एक मिनीटाचा हा सामना एवढा रंगला की नंतर दोन्ही खेळाडू अतिशय थकलेले दिसले आणि त्यांच्या पायात गोळे आलेले होते. 27 वर्षीय थिएम म्हणाला की, पण आज शरीरापेक्षा मन अधिक मजबूत होते आणि त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे.

थिएमला अजिंक्यपद गुणाच्या तिसऱ्या संधीवर जेंव्हा झ्वेरेव्हचा बॕकहँड फटका बाहेर पडला आणि थिएमने आनंदाने आपला चेहरा झाकून घेतला आणि मैदानावर त्याने लोळण घेतली. जेंव्हा त्याने चेहऱ्यावरुन हात काढला तेंव्हा झ्वैरेव्ह त्याचे अभिनंदन करण्यासाठी तिथे पोहोचलेला होता आणि थिएमच्या कौतुकात टाळ्या वाजवत होता. चार तासांच्या वर लढल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे आणि खेळाडूवृत्तीचे हे अनोखे दर्शन होते. थिएमनेसुध्दा आपल्या उंचपुऱ्या मित्राच्या खांद्यावर डोके टेकवले. दुसरीकडे झ्वेरैव्हचेही कौतुक करायचे तेवढे कमीच होते कारण तो आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाच्या फक्त दोन गूण दूर होता पण त्या दोन गुणांनी फरक केल्यावर त्याने अतिशय दिलदारपणे थिएमचे कौतुक केले होते. थिएम म्हणाला की, दोघांना विजेते घोषीत करता आले असते तर किती बरे झाले असते? आम्ही दोघेही विजेतेच आहोत.,

थिएमच्या आधी म्हणजे फार फार वर्षांपूर्वी अगदी 1949 मध्ये कुणी युएस ओपन टेनिस स्पर्धा पहिले दोन सेट गमावल्यावर जिंकली होती. त्यावेळी पांचो गोंझालस यांनी टेड श्रोडरवर तो अविश्वसनीय विजय मिळवला होता.

झ्वेरेव्ह म्हणाला की, मी 23 वर्षांचा आहे ते पाहता मला नाही वाटत की ही माझी शेवटची संधी आहे. चार तासांच्या या सामन्यात पहिल्या दीड तासातच तो 6-2, 6-5, 2-1 असा सरळ विजयाकडे वाटचाल करताना दिसत होता. पण तिसऱ्या सेटमध्ये थिएमने पहिल्यांदा माझी सर्विस भेदली आणि सामन्याला कलाटणी मिळाली. तो चांगला खेळत गेला आणि माझा खेळ घसरत गेला असे झ्वेरेव म्हणाला.

या सामन्याची एक रंजक आकडेवारी ही की झ्वेरेव्हने 15 एसेस लगावल्या आणि तेवढेच डबल फाॕल्ट केले तर थिएमनेही 8 एसेस आणि 8 डबल फाॕल्ट केले.

थिएमच्या रुपाने ग्रँड स्लॕम स्पर्धात तब्बल 13 स्पर्धानंतर फेडरर- नदाल -जोकोवीचशीवाय कुणी नवा चेहरा दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER