71 वर्षांत हा पराक्रम करणारा डॉमिनिक थिएम पहिलाच

Dominic Thiem

पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमध्ये (Tennis) पहिले दोन सेट गमावल्यावर सामना जिंकणे ही सोपी गोष्ट नाही. त्यातल्या त्यात ग्रँड स्लॕम (Grand Slam) स्पर्धांसारख्या अत्त्युच्च दर्जाच्या स्पर्धेत आणि ग्रँड स्लॕम अंतिम सामन्यात तर क्वचितच. आॕस्ट्रियाचा डॉमिनिक थिएम (Dominic Thiem) हा आता या क्वचित विजेत्यांच्या यादीत जाऊन पोहोचलाय.

युएस ओपनच्या अंतिम सामन्यातील त्याचा अॕलेक्झांडर झ्वेरेव्हवरचा 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 (8-6) हा विजय हा तब्बल 71 वर्षात कुणी युएस ओपन टेनिस स्पर्धा दोन सेटच्या पिछाडीवरुन जिंकण्याचा ऐतिहासिक विजय होता. थिएमच्या आधी म्हणजे फार फार वर्षांपूर्वी अगदी 1949 मध्ये कुणी युएस ओपन टेनिस स्पर्धा पहिले दोन सेट गमावल्यावर जिंकली होती. त्यावेळी पांचो गोंझालस यांनी टेड श्रोडरवर तो अविश्वसनीय विजय मिळवला होता.

टेनिसमध्ये 1968 पासून खुले युग (Open Era) सुरु झाले तेंव्हापासून केवळ पाचच खेळाडू असे दोन सेटच्या पिछाडीवरुन ग्रँड स्लॕम अंतिम सामना जिंकू शकले आहेत. हे पाच खेळाडू असे..

1) ब्योन बोर्ग- 1974 फ्रेंच ओपन वि. ओरांतेस
2) इव्हान लेंडल- 1984 फ्रेंच ओपन वि. मॕकेन्रो
3) आंद्रे अगासी- 1999 फ्रेंच ओपन वि. मेद्वेदेव
4) गॕस्टन गॉडियो- 2004 फ्रेंच ओपन वि. कोरिया
5) डॉमिनीक थिएम- 2020 युएस ओपन वि. झ्वेरेव्ह

थिएमच्या या विजेतेपदाने 13 ग्रँड स्लॕम स्पर्धानंतर प्रथमच नदाल- फेडरर- जोकोवीचशिवाय कुणी वेगळा चेहरा ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकला. यापूर्वी 2016 च्या युएस ओपनमध्ये स्टॕन वावरिंका जिंकला होता. तर 2014 च्या युएस ओपननंतर प्रथमच पुरुष खेळाडूंमध्ये पहिला ग्रँड स्लॕम विजेता मिळाला आहे. थिएमचे हे पहिलेच स्लॕम विजेतेपद आहे. 2000 पासूनचे असे पहिले ग्रँड स्लॕम विजेते ..

2003-.युआन कार्लोस फेरेरो- फ्रेंच ओपन
2003- रॉजर फेडरर – विम्बल्डन
2003- अँडी रॉडीक- यूएस ओपन
2004- गॕस्टन गाॕडिऔ- फ्रेंच ओपन
2005- राफेल नदाल-.फ्रेंच ओपन
2008- नोव्हाक जोकोवीच- आॕस्ट्रेलियन ओपन
2009- युआन मार्टिन डेल पोत्रो- युएस ओपन
2012- अँडी मरे- युएस ओपन
2014- स्टॕन वावरिंका- आॕस्ट्रेलियन ओपन
2014- मारिन सिलीच- युएस ओपन
2020- डॉमिनिक थिएम- युएस ओपन

थिएम हा 27 वर्षांचा आहे आणि त्याच्या रुपाने तब्बल 63 ग्रँड स्लॕम स्पर्धानंतर 1990 नंतर जन्मलेला खेळाडू ग्रँड स्लॕम चॕम्पियन ठरला आहे. थिएमचा झ्वेरेववरचा हा सलग चौथा आणि 10 सामन्यांतला 8 वा विजय ठरला.

2003 नंतर युएस ओपनमध्ये पहिल्यांदाच पुरुष व महिला दोन्ही गटात अंतिम फेरीत माजी विजेते खेळाडू नव्हते. 2019 चे विजेते राफेल नदाल व बियांका आंद्रिस्कू यंदा सहभागी नव्हते तर 2002 चे विजेते पीट सॕम्प्रास व सेरेना विल्यम्स हे 2003 च्या स्पर्धेत नव्हते. या स्पर्धेच्या इतीहासात 2012 नंतर प्रथमच दोन्ही गटाचे अंतिम सामने पूर्ण लांबीचे (तीन सेट व पाच सेट) झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER