
- दिल्ली हायकोर्टाचा सरकार, विमान कंपन्यांना आदेश
नवी दिल्ली : तोंड व नाक पूर्णपणे झाकले जाईल अशा प्रकारे मास्क (Mask) न लावणाºया आणि अन्य ‘कोविड प्रोटोकॉल’चे पालन न करणार्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाण करणार्या कोणत्याही विमानात प्रवेश दिला जाऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation) आणि सर्व विमान कंपन्यांना दिला आहे.
उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्या. सी. हरीशंकर यांना ५ मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानाने कोलकता ते दिल्ली हा प्रवास करताना जो अनुभव आला त्यावरून त्यांनी हा विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून हाती घेऊन हा आदेश दिला. मास्क न लावलेल्या प्रवाशांना विमानात प्रवेश दिला जाऊ नये व विमानात बसल्यावर जे प्रवासी वारंवार सांगूनही तोंड व नाकावर सतत मास्क लावून बसणार नाहीत त्यांच्यावर ठरविक काळासाठी विमान प्रवासास बंदी करण्यासह अन्य दंडात्मक कारवाई करावी. तसेच ज्या विमान कंपन्या प्रवाशांकडून नियमांचे पालन करून घेण्यात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावरही कारवाई करावी, असाही आदेश दिला.
कोलकाता ते दिल्ली या विमान प्रवास स्वत:ला आलेला अनुभव नमूद करताना न्या. हरीशंकर लिहितात: विमानतळावरून विमानापर्यंत घेऊन जाणाºया बसमध्ये व नंतर विमानात बसल्यावरही बहुसंख्य प्रवाशांनी मास्क तोंड व नाक पूर्णपणे झाकले जाईल असे न लावता हनुवटीवर लावले होते. मी स्वत: हटकल्यावर काही प्रवाशांनी नाखुशीने तेवढ्यापुरता हनुवटीवरचा मास्क नाका-तोंडावर ओढला. विमान कर्मचाºयांना विचारले असता त्यांनी‘ आम्ही प्रवाशांना विनंती करतो. पण त्यांनी न ऐकल्यास आम्ही काहीच करू शकत नाही’, अशी हतबलता व्यक्त केली.
न्या. हरीशंकर लिहितात की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकृत वेबसाईटवर शोधले असता विमान प्रवासात पाळायच्या ‘प्रोटोकॉल’संबंधी कोणतीही ताजी माहिती दिसली नाही. त्यात सर्वात शेवटचे जे नियम टाकले आहेत ते गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील आहेत.
आपण अनुभवलेली परिस्थिती गंभीर आहे व त्याने प्रवाशांंच्या तसेच विमान कर्मचार्यांच्या आरोग्यासही धोका आहे, असे नमू करून न्यायालयने पुढील आदेश दिले:
- विमान प्रवासादरम्यान पाळायच्या ताज्या ‘प्रोटोकॉल’ची माहिती ‘डीजीसीए’ने त्यांच्या वेबसाआटवर शोधावी लागणार नाही अशा प्रकारे ठळकपणे लगेच प्रसिद्ध करावी.
- प्रत्येक विमान कंपनीने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’सोबतच मास्क लावणे व अन्य नियमांची माहिती छापील स्वरूपात द्यावी. हे नियम पाळले नाहीत तर काय कारवाई होईल याचाची स्पष्ट उल्लेख त्यात असावा.
- जे प्रवासी मास्क लावणार नाहीत त्यांना विमानात प्रवेश देऊ नये. प्रवासात सांगूनही मास्क न लावणाºया प्रवाशांवर ‘प्रवासबंदी’ची कारवाई करावी.
- विमानात केल्या जाणाºया उदघोषणांमध्ये मास्क लावण्यासह अन्य नियम व ते पाळले नाहीत तर केल्या जाऊ शकणाºया कारवाईचीही माहिती दिली जावी.
- प्रवासी नियमांचे पालन करतील याची जबाबदारी विमान प्रवाशांची असेल व त्यासाठी त्यांनी कशोशीने प्रयत्न करून सतत सतर्क राहावे.
- प्रवासात असलेल्या विमानांमध्ये ‘प्रोटोकॉल’चे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी ‘डीजीसीए’ने आपले अधिकारी पूर्वसूचना न देता पाठवून अचानक तपासणी करावी.
- ज्या विमान कंपन्या यात हयगय करत असल्याचे आढळले तर त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करावी.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला