कोरोनाचे निदान श्वान करणार !

Dogs

लंडन : कोरोनाच्या उपचारासोबत त्याचे अचूक निदान हे पण आरोग्य जगतापुढे आव्हान ठरते आहे. कोरोनाच्या निदानाला लागणारा वेळ जितका कमी होईल तितक्या लवकर उपचार सुरू होऊ शकतो. कोरोना रुग्णांचे निदान करण्यासाठी श्वानांचा उपयोग करण्याचा प्रयोग सुरू आहे. यासाठी ब्रिटनमध्ये श्वानांना प्रशिक्षण देणे सुरू आहे.

सरकारने यासाठी पाच लाख पौंड (भारतीय चलनामध्ये अंदाजे साडेचार कोटी रुपयांहून अधिक) निधी मंजूर केला आहे. श्वान हे रुग्णाच्या गंधावरून रुग्णाला कोरोना आहे का हे ओळखू शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. ‘मेडिकल डिटेक्शन डॉग्स’ (MDD), डरहम युनिव्हर्सिटी आणि ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन’ (LSHTM) या तीन संस्था या संशोधनावर संयुक्तपणे काम करत आहेत.

युनायटेड किंगडम (UK) सरकारमधील मंत्री जेम्स बेथल याबाबत म्हणाले की, “बायो-डिटेक्शन श्वान पहिल्यापासून कर्करोग ओळखतात. कोरोनावर सुरू असलेल्या या संशोधनात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आम्हाला लवकरच यात यश मिळेल याची खात्री आहे.” या संशोधनात सहा लॅब्रेडाॅर आणि कॉकर स्पेनियल श्वानांना लंडनमधील रुग्णालयातील कोरोनाबाधित नसलेल्या आणि कोरोनाच्या रुग्णांच्या गंधांचा फरक ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या गंधावरून श्वान संकेत देतील व त्या आधारे कोरोनाचे निदान होईल.

या ‘मेडिकल डिटेक्शन डॉग्स’मधील श्वानाला याआधी कर्करोग, पार्किंसंस आणि मलेरियासारखे आजार ओळखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास एक प्रशिक्षित श्वान तासाला २५० लोकांची कोरोना चाचणी करू शकतो! या प्रशिक्षित श्वानांचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी आणि विमानतळावर होऊ शकतो. इंग्लंडशिवाय अमेरिका आणि फ्रान्समध्येही संशोधक, श्वानांना कोरोनाची लक्षणं ओळखण्याचे प्रशिक्षण देत आहेत. श्वानांची गंधाचे विश्लेषण करण्याची क्षमता मनुष्यापेक्षा हजारपट जास्त असते. बॉम्बशोधक पथकात श्वान आधीपासूनच आहेत. मधुमेह आणि कर्करोगासारखे आजार श्वान ओळखू शकतात हे संशोधनात सिद्ध झाले आहे. आता श्वान गंधाने बॅक्टेरिया ओळखू शकतो का, यावर संशोधन सुरू आहे.

श्वानांची गंध विश्लेषण क्षमता
मेडिकल डिटेक्शन डॉग्स (MDD) नुसार, श्वानांची गंध विश्लेषणाची क्षमता ३० कोटींपेक्षा आधिक रिसेप्टर्स असते. माणसाची हीच क्षमता ५० लाख आहे. त्याशिवाय श्वानांचा मेंदू ३० टक्क्यांपेक्षा अधिक गंधाच्या विश्लेषणावर काम करतो. श्वानाची श्वास घेण्याची सिस्टम प्रतिट्रिलियनमध्ये काही कणांच्या स्तरापर्यंत एखादा पदार्थ ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरातील, आजारी अंगातून एक विशेष प्रकारचा ‘बायोमार्कर्स’ सोडला जात असतो. जो आजाराचा वाष्पशील ऑर्गेनिक कंपाउंड्स (VOC) सिग्नेचरचा एक भाग होतो. हे VOC श्वास, पेशी आणि मल-मूत्राद्वारे शरीरारातून बाहेर पडतात त्यावरून माणसाची ‘मेटाबॉलिक’ स्थिती ओळखली जाऊ शकते. एखाद्या रोगामुळे संक्रमित झाल्यास त्याचा गंध बदलतो, ज्यावरून प्रशिक्षित श्वान त्याला ओळखू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला