मराठा आरक्षणावरून सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का? – विनायक मेटे

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत

Vinayak Mete

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा नेत्याने केली नाही. तरीही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) हे तसे वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करत आहेत. सरकारला मराठा समजाला आरक्षण द्यायचं नाही का? असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी विचारला. विनायक मेटे यांनी आज या संदर्भात पत्रपरिषद घेतली. त्यांनी विचारले, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस पावले का उचलली जात नाहीत? यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

उद्या काही असाधारण परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी सरकारच जबाबदार असेल. मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितलेलं नाही. तरीही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलनेही सुरू केली असून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर काहीही अंकुश ठेवला नाही; सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का?

अजितदादा, थोरात, शिंदे बोलत का नाहीत?

ओबीसी नेते, मंत्री आरक्षणावर बोलत असताना सरकारमधील मराठा मंत्री गप्प का बसलेले आहेत? छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावर बोलतात; मग उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? विजय वडेट्टीवार बोलतात, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात का भूमिका घेत नाहीत? माजी आमदार प्रकाश शेंडगे बोलतात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई मौन बाळगून का आहेत? मराठा आमदारही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

अधिवेशनात चर्चा करा

राज्यात उद्यापासून दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन होते आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. मराठा आमदार आणि मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मेटे यांनी केले. सर्व मराठा आमदारांना पत्रं लिहून ही चर्चा घडवून आणण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितलं. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER