काँग्रेसचा ‘गुपकर आघाडी’च्या अजेंड्याला पाठिंबा आहे का? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :  जम्मू-काश्मीरमध्ये ‘गुपकर आघाडी’ ही राष्ट्रविरोधी आघाडी कार्यरत असून या आघाडीचा आम्ही निषेध करतो. आश्चर्याची बाब म्हणजे या आघाडीमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे गुपकर आघाडीच्या अजेंड्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरोधी शक्ती आहेत, अशा शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून पुन्हा कलम ३७० लागू झाले  पाहिजे, असा प्रयत्न करत आहेत.

गुपकर नावाने तिथे अनेक पक्षांचे  एकत्रीकरण झाले आहे. गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसही समाविष्ट आहे. आमचा काँग्रेसला प्रश्न आहे, की गुपकर आघाडीचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का? चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करू, असे फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. यापेक्षा आश्चर्यकारक आणि संतापजनक दुसरे  काहीच असू शकत नाही.

मेहबुबा मुफ्ती म्हणतात, काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही तर आम्ही राष्ट्रीय झेंडा लावू देणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आमच्यासोबत सत्तेत असताना तिरंग्याचा अपमान करण्याची पीडीपीची हिंमत होत नव्हती. मात्र, आता तिरंग्याचा ते अपमान करत असताना काँग्रेस त्यांच्यासोबत गेली आहे. अशा लोकांसोबत काँग्रेस जात असेल तर त्यांचा चेहरा उघडा पाडायला हवा, या शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही फुटीरतावाद्यांना सोबत घेऊ, असे गुपकर आघाडी म्हणते आहे.

अशी मागणी करणाऱ्यांसोबत जर काँग्रेस उभी असेल तर आम्ही याबाबत काँग्रेसला रोज प्रश्न विचारू आणि देशासमोर सर्व देशभक्त आणि राष्ट्रीय शक्ती मिळून उघड पाडू, या कृतीचा आम्ही उघडपणे निषेध करतो. काहीही झालं तरी देशात पुन्हा ३७० कलम लागू देणार नाही, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER