
कोल्हापूर : एक ते वीस रुपयापर्यंतची नाणी चलनात आहे. त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरविण्यात आले आहेत. ही नाणी अस्तित्वात आणि चलनात आहेत. त्यामुळे ग्राहक, नागरिकांनी आणि बँक यांनी ही नाणी स्वीकारावी यासाठी खास मेळाव्याचे आयोजन कोल्हापुरात (Kolhapur) केले होते.
कालपर्यंत चिल्लर नको म्हणणारे ग्राहक आज स्वतःहून चिल्लर द्या, असे म्हणताना दिसून आले. शाहूपुरीतील बँक ऑफ इंडिया शाखेत आज कॉईन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत मेळाव्यात सुमारे ३५० नागरिक सहभागी झाले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि बँक ऑफ इंडियातर्फे (Bank Of India) या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन आरबीआय बेलापूर येथील महाप्रबंधक मनोज रंजन यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांच्या सोयीसाठी मेळावा
नागरिकांच्या सोयीसाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये आरबीआयच्या नियमानुसार चलन वाटप करण्यात येईल, असे हेमंत खेर यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात दहा नागरिकांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते नाणी वाटप करण्यात आले.
चिल्लरचे महत्व वाढावे म्हणून मेळावा
दरम्यान, या मेळाव्यात पाच ते दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. एक, दोन, पाच, दहा, वीस रुपयाच्या नव्या नाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी बँकेकडून नोटा, नाण्यांची माहितीचा फॉर्म भरून घेण्यात आला. चिल्लरचा वापर दैनंदिन जीवनात व्हावा, दैनंदिन व्यवहारात बाजारामध्ये 10 पासून ते 2000 पर्यंतच्या नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. एखाद्याने चिल्लर देण्याचा प्रयत्न केला तर चिल्लर नको, असे ग्राहकाला सांगण्यात येते. तर, काही ग्राहक देखील चिल्लर देऊ नका असे म्हणतात. मात्र, बाजारातील चिल्लरचे महत्व दैनंदिन व्यवहारांमध्ये वाढावे, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तसेच, पाच रुपयाची नोट देखील बाजारात चलनात आली पाहिजे, हा या मेळाव्याचा उद्देश होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला