ठाण्यात डॉक्टरालाच झाली कोरोनाची बाधा

Corona Virus

ठाणे : मागील दोन दिवसांत ठाण्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता.  त्यामुळे ठाणेकरांना थोडासा दिलासा देणारी बातमी होती. परंतु आता ठाण्यात एका डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला उपचारार्थ ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता त्याच्या दवाखान्यात मागील तीन ते चार दिवसांत किती रुग्ण येऊन गेले याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत काढली जात आहे. तसेच त्याची पत्नी आणि मुलाला आता होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या डॉक्टराची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ही बाधा झाली असावी, अशी शक्यताही वर्तविली जात असून त्यानुसार तो रुग्ण कोण, तो कुठे आहे, याचा शोध सुरू झाला असून त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ठाण्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या इतर शहरांच्या तुलनेत बरी होती.

परंतु आता ठाण्यासाठी चिंतेची गोष्ट निर्माण झाली आहे. ठाण्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही १२ एवढी होती. त्यात गुरुवारी सकाळी आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. काजुवाडी भागात दवाखाना चालवीत असलेल्या एका डॉक्टरालाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या डॉक्टर रुग्णाला कस्तुरबा येथे हलविण्याच्या हालचाली बुधवारी रात्री सुरू होत्या. नंतर त्याला मोठ्या खाजगी रुग्णालयात जाण्यासही सांगण्यात आले होते.

परंतु तेथे बेड उपलब्ध नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची शोधमोहीम पालिकेने सुरू केली आहे. यासाठी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदतही घेतली जात असल्याची माहिती डॉ. आर. टी.  केंद्रे यांनी दिली. संबंधित डॉक्टरची पत्नी आणि मुलालाही मानपाडा येथील त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात आल्याचेही केंद्रे यांनी सांगितले. तसेच त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.