रोहित पवारांना अहल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का? पडळकरांचा सवाल

Rohit Pawar - Gopichand Padalkar

पुणे :- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघात असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते .

त्यावरून भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राज्यातील पई पाव्हण्यांचे सरकार अहल्यादेवींच्या स्मारकांचा फक्त राजकारणासाठी वापर करणार असल्याचं दिसून येतंय. आधीची स्मारक समिती सूडबुद्धीने बरखास्त करण्यात आली आहे. या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे, अशी टीका करतानाच अहल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला रोहित पवारांना पोस्टर बॉय बनवायचे आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

ये पब्लिक है, सब जानती है, या शीर्षकाखाली एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून पडळकरांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहल्यादेवींचं नाव विद्यापीठाला देण्यात यावं, अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : पडळकर आमदार होईपर्यंत चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांदीच्या चप्पला आणि ‘पॅशन’ देऊन सत्कार 

पडळकर यांची फेसबूक पोस्ट :
वर्षभरापासून पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठात अहल्यादेवींचा अश्वारूढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण तीन कोटींची मागणी आहे. त्यापैकी दीड कोटी विद्यापीठ व दीड कोटी सरकार असा निधी उपलब्ध करून देणार होते. विद्यापीठाने एक कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली. पण हे सरकार निधी देत नव्हतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ‘पई पाव्हण्यांचं सरकार’ याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.

पहिली स्मारक समिती सूडबुद्धीने बरखास्त करून आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहील याची सोय लावली. स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलं. आणि त्यांना समितीवर घेतल्या घेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला ‘पोस्टर बॉय’ बनवायचं का? असा सवालही त्यांनी केला.

मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते, राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख यांचं नाव या समितीत सर्वांत वर असायला हवं होतं. देशमुख यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केलं. त्यांचं नाव ७ नंबरला टाकून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं होतं? मंत्री उदय सामंत यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेयमामा भरणे व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

रोहित पवारांचं धोरण म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’… आपल्या नातवाला लाँच करण्याची किती ही धडपड? जिथं जिथं अहल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येतायेत. हे कालच्या जेजुरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे. समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय, असं सांगतानाच, पण एक लक्षात ठेवा… आता, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही…अशी टीकाही त्यांनी केली. ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळीतून पडळकर यांनी सांगितल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER