महापालिका निवडणुकांमध्ये आघाडीसोबत जायचे का? काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होणार

nana Patole - Mahavikas Aghadi

मुंबई : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत जायचं का? या मुद्द्यावर लवकरच काँग्रेसतर्फे निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असून त्यात महापालिका निवडणुकांबाबत आघाडीसोबत जाण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाइंट येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे.

या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहीम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे.

राज्यातील आगामी पाच  महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेच्या बांधणीसंदर्भात नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी १२ वाजता कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी ४ वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे.

तर गुरुवार २५ रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER