टी-२० च्या १० हजारी फलंदाजांच्या विक्रमांची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत आहेत का?

Chris Gayle - David Warner - Shoaib Malik - Kieron Pollard

कसोटी व वन डे क्रिकेटच्या तुलनेत टी-२० क्रिकेटचा (T20 Cricket) प्रसार फार वेगाने झाला आहे आणि जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या लिगच्या माध्यमातून भरपूर टी-२० सामने दरवर्षी खेळले जात आहेत. परिणामी टी-२० मध्ये विक्रमांचे टप्पेसुद्धा लवकर गाठले जात आहेत. जून २००३ मध्ये पहिला टी-२० सामना खेळला गेला. त्याला अजून १८ वर्षेसुद्धा झालेली नाहीत; पण एवढ्यात चार फलंदाजांनी १० हजार (10K runs) टी-२० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलिया व सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा त्या दस हजारी क्लबचा ताजा सदस्य आहे आणि विराट कोहली (Virat Kohli) त्याच मार्गावर आहे. विराट कोहलीला १० हजार टी-२० धावा करण्यासाठी आता फक्त १०६ धावांची गरज आहे तर डेव्हीड वॉर्नर हा बुधवारच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या खेळीनंतर आता १० हजार १७ धावांवर पोहचला आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या आधी वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (Chris Gayle) (13839 धावा), वेस्ट इंडिजचाच किरोन पोलार्ड (Kieron Pollard) (10694 धावा), पाकिस्तानचा शोएब मलिक (Shoaib Malik) (10488 धावा) यांनी हा मैलाचा दगड पार केलेला आहे. तर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॕक्युलम (9922 धावा), भारताचा विराट कोहली (9894) व आरोन फिंच (9718) हे त्यांच्यामागे आहेत. यापैकी मॕक्युलम आता सक्रिय नाही; पण कोहली व फिंचला दस हजारी क्लबमध्ये येण्याची संधी आहे.

सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक शून्यसुद्धा
या फलंदाजांमध्ये जो आघाडीवर आहे त्या युनिव्हर्स बाॕस ख्रिस गेलबद्दल बोलायचे तर सार्वाधिक धावांसह सर्वाधिक स्ट्राईक रेट, सर्वाधिक शतके व अर्धशतके, सर्वाधिक चौकार व षटकार असे बहुतेक सर्व विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये एक हजारावर चौकार व एक हजारावर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे क्रिकेट खेळले जाते त्या प्रत्येक ठिकाणच्या लीगमध्ये खेळल्याने ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक तब्बल २८ वेगवेगळ्या संघांसाठी खेळायचा विक्रम आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके व अर्धशतके नावावर असणाऱ्या याच फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक शून्यसुद्धा (२९) आहेत. अलीकडेच त्याने हा नकोसा विक्रमसुद्धा आपल्या नावावर करून घेतला आहे.

सर्वाधिक सामने व सर्वाधिक डाव
किरोन पोलार्डच्या १० हजार धावासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याने हा टप्पा गाठला असला तरी सर्वांत कमी शतके (फक्त एक) आणि सर्वांत कमी अर्धशतके (५२) त्याच्या नावावर आहेत. याचाच अर्थ हा की, पोलार्डला पाच आकडी धावा करण्यासाठी खूप जास्त सामने खेळावे लागले असतील आणि ते खरेही आहे. त्याने ५३९ सामन्यांच्या ४७९ डावांत १०,६९४ धावा केल्या आहेत आणि ख्रिस गेलपेक्षा तब्बल ११७ सामने आणि ६५ डाव त्याने अधिक खेळले आहेत आणि धावा मात्र गेलपेक्षा जवळपास तीन हजारांनी कमी आहेत.

एकाही शतकाशिवाय १००००+ धावा
शोएब मलिकचे वैशिष्ट्य हे की, १० हजारी फलंदाजात त्याचा स्ट्राईक रेट सर्वांत कमी (१२६.००)आहे आणि त्याला एकही शतकी खेळी करता आलेली नाही. त्याची सर्वोच्च खेळी नाबाद ९५ धावांची आहे. यामुळे शतकाशिवाय १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज अशी त्याची अनोखी नोंद आहे.

फक्त एकच डाव न खेळलेला फलंदाज
डेव्हिड वाॕर्नर याचे वैशिष्ट्य हे की, १० हजार धावांचा टप्पा ओलांडताना त्याने ३०४ सामन्यांच्या फक्त एकाच डावात फलंदाजी केलेली नाही आणि त्याच्या १०,०१७ धावांत तब्बल ५४४७ धावा एकट्या आयपीएलमधून आहेत आणि ८२ अर्धशतकांपैकी ५० अर्धशतके आयपीएलची आहेत. आयपीएलमध्ये अर्धशतकांचे अर्धशतक करणारा तो एकटाच आहे.

सर्वांत कमी व सर्वाधिक सरासरी
ब्रेंडन मॕक्युलमची सरासरी ९९२२ धावा करताना सर्वांत कमी २९.९७ राहिली आहे तर याच्या उलट विराट कोहलीची सरासरी या आघाडीच्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक ४१.७४ आहे. विराटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ भारत, इंडियन्स, दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या चारच संघांसाठी टी-२० सामने खेळलाय आणि सर्वांत कमी संघांसाठी खेळून १० हजार धावा पूर्ण करायच्या तो उंबरठ्यावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button