
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नव्या निवड समितीत (Selection Commitee) चेतन शर्मा (Chetan Sharma) अध्यक्ष आणि सदस्यपदी अॕबी कुरुविला, देवाशिष मोहांती यांची नियुक्ती झाली आहे. आधीचे सदस्य हरविंदर सिंग आणि सुनील जोशी हे कायम आहेत. याप्रकारे नवी निवडसमिती गठीत झाली आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इतिहासात ही अतिशय विशेष निवड समिती ठरणार आहे.
एकतर निवड समितीच्या पाचही सदस्यांना बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे आणि मंडळाचे अध्यक्षसुध्दा (सौरव गांगुली) भरपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत. असे पहिल्यांदाच घडले आहे की मंडळाचे अध्यक्ष आणि निवड समितीचे सर्वच सदस्य एकाच काळात सोबत आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
चेतन शर्मा व सौरव गांगुली हे बंगालसाठी सोबत खेळले आहेत. हरविंदरसिंग, अॕबी कुरुविला, देवाशिष मोहांती हे 1997 च्या सहारा कप स्पर्धेत खेळलेले आहेत. याच स्पर्धेत सौरव गांगुली चार वेळा सामनावीर ठरला होता. तर सुनील जोशी यांनी 5 धावात 6 बळी अशी आपली सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली त्या सामन्यात गांगुलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे निवड समितीचे पाचही सदस्य गोलंदाज आहेत. चार जलद गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज. असेही पहिल्यांदाच घडले आहे की निवड समितीवर सर्व गोलंदाजच आहेत. त्यामुळे ही निवड समिती फलंदाजांची कशी निवड करेल असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे तर गोलंदाजच फलंदाजांची परीक्षा घेत असतात. त्यामुळे कोणता फलंदाज अधिक चांगला हे गोलंदाजच अधिक चांगल्याप्रकारे सांगू शकतात असा दावा काहींनी केला आहे. काही असो, पण या दोन कारणांनी यावेळची निवड समिती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
दरम्यान, या निवड समितीवर नियुक्तीसाठी अजित आगरकरही इच्छूक होते पण त्याची निवड न होण्यामागे काहींनी गांगुलीकडे बोट दाखवले आहे. सौरव गांगुली संघाचे कर्णधार असतानाही त्यानी आगरकरला कधी पसंती दिली नव्हती हा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे आणि ही निवड समिती म्हणजे दादाज चाॕईस असल्याचे वर्णन करण्यात येत आहे. विद्यमान निवड समिती जी सुनील जोशींच्या अध्यक्षतेत कार्यारत होती तिच्या कामकाजावर तर सौरव गांगुलींचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते आणि सुनील जोशी यांना निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कधीच समोर आणले गेले नाही असे आरोपसुध्दा झाले. त्यामुळे आता चेतन शर्मांची निवड समिती तशीच झाकोळली जाईल की, स्वतःचे अस्तित्व दाखवेल हे काळच ठरवेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला