महाराष्ट्र किती मोठा आहे याची कल्पना तरी आहे का?

सुप्रीम कोर्टाकडून याचिकेची खिल्ली

Supreme Court

नवी दिल्ली : ‘महाराष्ट्र किती मोठा आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?’, अशा प्रश्नाने याचिकाकर्त्याची खिल्ली उडवत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तडकाफडकी फेटाळली. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पार ढासळली असल्याने उद्धव ठाकरे यांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश द्यावा, अशी थिल्लर जनहित याचिका विक्रम गेहलोत नावाच्या इसमाने केली होती. ती सुनावणीसाठी पुकारली जाताच सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने त्यांना स्पष्टपणे सांगितले की, असली याचिका आम्ही अजिबात ऐकणार नाही. हवे तर तुम्ही तुमची विनंती राष्ट्रपतींकडे जाऊन करू शकता.

या उप्परही याचिकाकर्त्याने आपले म्हणणे मांडणे सुरुच ठेवले. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था पार ढासळली आहे व तेथे संविधानानुसार राज्य चालविले जात नाही, या आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणावत हिच्या घराचे बांधकाम पाडले जाणे, या घटनांचा संदर्भ दिला.

या दोन्ही घटना फक्त मुंबईतील आहेत, असे न्या. बोबडे यांनी निदर्शनास आणल्यावर याचिकाकर्ता म्हणाला की, याहून इतरही अनेक  घटना आहेत. पण तुम्ही याचिकेत तर फक्त मुंबईतीलच घटनांचा उल्लेख केला  आहे, असे सांगून न्या. बोबडे त्यांना म्हणाले,  कोणा बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूवरून तुम्हाला कायदा-सुव्यवस्था ठीक नाही, असे म्हणायचे आहे तर ! पण महाराष्ट्र किती मोठा आहे,याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER