कायम गृहितच धरता का ?

House Wife

हाय फ्रेंड्स ! दोन तीन दिवसापूर्वीचा याच “मनसंवाद” सदरातील ,”हो ! मी गृहिणीच आहे.”हा लेख वाचलाच असेल त्यात आपण बघितलं की सतत गृहीत धरली जाते ती गृहिणी असं गृहिणीचा वर्णन किती सार्थ वाटतं ना ? कुणी म्हणेल, गृहीत धरणं काय वाईट! त्यातून मनात जवळ येतात, नाती घट्ट होत जातात. आपण सगळेजण शेजारच्यांच्या किल्ल्या सांभाळणं, त्यांच्या कुंड्यांना, ते बाहेरगावी गेले असताना पाणी घालणं हे सगळं करत असतो की ! त्यालाच तर शेजार धर्म म्हणतात. इतरही नात्यांमध्ये अस धरणं असतंच. घरात काकू आहे म्हटले की ती सगळ्या मुलांना एकत्र जेवायला देणारच ! अर्धा तास उशीर झाला घरी जायला तरी हरकत नाही किंवा आजीजवळ मुलांना सोडून काही अपरिहार्य कारणास्तव जायचं असेल तर जाणं हेही घडतच .आपण एकटेच आहोत तर सरळ मैत्रिणीला,” चल आज मी येते तुझ्याकडे जेवायला. आपण दोघी मिळून काहीतरी छान बनवून आणि जेवण करून खूप गप्पा मारू, “असेही बेत होतातच की आपले. घरचा टीव्ही बिघडला आणि महत्त्वाची मॅच आहे तर शेजारच्या काकांकडे जाऊन मॅच पाहणे ही आपली संस्कृती आहे. यात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे. बरेचदा यामागे आदर, माया, दखल, किमान केल्याची जाणीव एवढंच असतं !

(खरंतर सारख ते उच्चारून दाखवून किंवा परत परत कौतुक बोलून दाखवण्याची ही गरज नसते ते कृतीतूनही दाखवता येत.)तर मंडळी असं असतं ते आपल्या माणसांना गृहीत धरण.

पण आपल्याला करमत नाही म्हणून, शैला काकू दररोज शेजारी टीव्ही बघायचा निमित्त्याने जाऊन बसतात. शेजारणी चे बाळ लहान आहे, संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो ,या कशा कशाचंही भान त्यांना नसतं. आपला टाईमपास हा दुसऱ्याच्या या रुटीनच्या किंवा वैयक्तिक आयुष्याच्या मध्ये तर येत नाही ना याचा कधीतरी तर विचार व्हावा.

काही घरातील कामं, माधुरीताई ठरवून करत राहतात. वयोमानाप्रमाणे सवय राहावी, हात पाय चालू राहावे म्हणून त्या हे नियमित करतात. आता त्यांच्या सुनेलाही त्याची सवय झाली. पण काही दिवसांपूर्वीपासून त्यांनी अचानक ही कामे बंद करून टाकली .कारण कुठलेही असो. कदाचित थंडीचा त्रास होत असेल, थकवा येत असेल किंवा आणखीन काही ! पण आता ते काम रात्रीपर्यंत पडलेले पाहून सुनेची दोन दिवस चिडचिड झाली. कारण बाहेरून उशिरा आल्यावर तिला हे काहीच झालेलं न दिसल्याने तिची एकदम खूप फजिती झाली. अर्थात तिने त्यांना नकळत गृहीत धरलं होतं. आणि नंतर तिला ते न सांगता बंद करून त्यांनी पण तिला गृहितच धरलं की ! त्याऐवजी आपली अडचण सांगून ते काम सोपवलं असतं तर बर झाल असतं.

अनुश्री दररोज मुलाला आईकडे सोपवून नोकरीला जाते. परंतु सुट्टीच्या दिवशी पण दोघांना फिरायला एकत्र जायचं असतं, म्हणून मुलाला आईकडेच सोपवते. तिला एखादा तरी दिवस आराम द्यावा. तिची बाहेरची दोन कामे करून द्यावी. असे अनुश्रीला चुकूनही मनात येत नाही. आईचाही आता वय झाले, तिचंही काहीतरी दुखत खुपत असेल हे काहीही लक्षात न घेता असे गृहीत धरणे आईलाही बोचतच राहते.

संदीपच्या जाण्याच्या रस्त्यावरच सुनयनचे ऑफिस आहे. त्यामुळे तिला जाताजाता ऑफिसला सोडत जा असं मावशीने सांगितले आहे .संदीप घरातून लवकर बाहेर पडतो. परंतु सुनयना दररोजच तयार व्हायला एवढा उशीर लावते कि संदीपला दररोज तिला सोडून ऑफिसला जाण्यास उशीर होतो. आणि लेट मार्क लागतो. शेवटी वैतागून संदीपने मावशीला त्याची अडचण सांगितली आणि ते काम बंद केलं. कदाचित मावशीला वाईट वाटेल. पण तिनेही सुनयनाला समज द्यायला हवी होती.

म्हणजे बहुतांशी या गृहीत धरण्यातूनच नाती बहरतात, पण अतिरेकी गृहीत धरणे हेही बरेचवेळा नात्यांमधला ताण वाढवते, कटुता आणते. पुलंच्या पुस्तकातला नारायण होणे, असे कधी कधी जडही जाते.

फ्रेंड्स ! जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा परस्परांना मदत करण, मदत घेणे हा आपल्या सामाजिक जीवनाचा भाग आहे. सामाजिक नातेसंबंधांसाठी ते खूप गरजेचेही आहे. आजच्या काँक्रीटच्या जंगलात खरे तर हे ही दुर्मिळ होत जात आहे. त्यामुळे या गोष्टीत खूप चांगुलपणा आहे,मात्र या चांगुलपणाचा कुणी जर गैरफायदा घेत असेल तर तो घेऊ देणे हे मात्र योग्य नाही. मदत मागणे आणि नोकर समजून काम करून घेणे यात खूप फरक आहे. लोकांचे कसेही वागणे, उडवून लावणे ऐकून घेऊन आपण मात्र प्रेमाने करत राहणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा सारखे होईल. नाही का? आपला आत्मसन्मान आपणच जपायला हवा आणि तेवढीच गरज असेल तेथे पुढाकार घेऊन मदतही करायला हवी. फक्त तेथे समतोल राखता कसा येईल यावर विचार करावा. त्यासाठी गरज असते, asserativeness ची! याचा सरावच हवा. दुसऱ्याला न दुखवता आपले मत स्पष्टपणे पण नम्रपणे मांडणे.

ह्या बातम्या पण वाचा :

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER