तंगड्या सर्वांना असतात, तंगड्या तोडण्याची भाषा बोलू नका ; राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला चढवला. उदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही उत्तर देण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावे लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगड्या सगळ्यांना आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

ही लोकशाही आहे. मोदींना आणि राष्ट्रपतींना लोक प्रश्न विचारतात. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्याची भाषा बोलू नये. तुम्ही राजकारणाबाहेर असतात तर चालले असते. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज आहोत. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

तंगड्या तोडण्याची भाषा लोकतंत्रात चालणार नाही. तंगड्या सर्वांनाच असतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊतांनी कोल्हापूरचे संभाजीराजे, साताराचे शिवेंद्रराजे यांची स्तुती सुद्धा केली. कोल्हापूरमधील सध्याचे शाहू महाराज यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांचे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे ते म्हणाले.