महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका; संभाजीराजेंचा भुजबळांना सल्ला

Sambhajiraje Chhatrapati - Chhagan Bhujbal

मुंबई :- भुजबळ साहेब आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात. तुमच्या जेष्ठत्वाचा आम्ही आदर करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका,” असा सल्ला खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी भुजबळांना दिला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला आहे. आपल्यासारख्या जेष्ठ राजकारण्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे,” असा टोलाही संभाजीराजेंनी भुजबळांना लगावला.

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी संसदेतील भाषणासह इतर मुद्द्यांवर स्पष्टीकरणं दिलं आहे. “मी शिव- शाहूंचा वारस आहे. मी कधीही जातीवाद करत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊन जातीवाद कमी करण्याचाच प्रयत्न करत आहे. असे संभाजीराजेंनी पोस्टमध्ये लिहीले आहे.

संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळांनी मी संसदेत केलेल्या भाषणावर भाष्य केलं. बी. बी. सी.मराठी वरती त्यांची मुलाखत होती, त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे दिसून येते. यातून महाराष्ट्राची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने आणि माझी वास्तव भूमिका महाराष्ट्राच्या समोर आणण्याकरिता मी ही लिहित आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या घटना दुरुस्ती बिलावर मी ते भाषण केलं होतं. ज्यामध्ये मराठा समाजावर कश्याप्रकारे अन्याय झाला? हे मी सिद्ध केलं होतं. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. 1967 पर्यंत मराठा समाजाचा ओबीसी(इंटर मीडियेट क्लास) च्या राष्ट्रीय यादी (central list) मध्ये समावेश होता आणि अचानक 1968 मध्ये अचानक मराठा जातीला वगळण्यात आले. 1967 मध्ये एका जीआरच्या अनुषंगाने मराठा, माळी आणि तेली या जातींना वगळले होते. त्यानंतर 1968 मध्ये फक्त मराठा समाजाला बाहेर ठेऊन माळी आणि तेली जातींना आत घेतलं गेलं. मी कुणाही जातीच्या विरोधात नाही पण शाहू महाराजांची आरक्षणाची मूळ भावना काय होती? हेच मी बोललो.

एका जबाबदार मंत्री महोदयांकडून मला ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझ्या भाषणातील केवळ एक दोन शब्द सुटे काढून, तेही दुसऱ्याने पाठवलेले वाचून मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेब आपण अनेक दशकांपासून राजकारणात आहात, तुमच्या जेष्ठत्वाचा आम्ही आदर करतो. पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका.

मी जे उदाहरण दिले, जे शब्द वापरले ते, गंगाराम कांबळे यांना राजर्षीं शाहू छत्रपती महाराजांनी हॉटेल काढून दिल्याच्या संदर्भातील होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राजर्षींनी जे केलं, ते देशाला कळावं म्हणून उदाहरण दिलं. आजही देशातील राजकारण्यांनी त्या प्रसंगातून आदर्श घेतला पाहिजे हा माझा शुद्ध हेतू होता.

मी शिव- शाहूंचा वारस आहे. मी कधीही जातीवाद करत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊन जातीवाद कमी करण्याचाच प्रयत्न करत आहे. ज्याला आपल्यासारख्या जेष्ठ राजकारण्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे, अशी भावना संभाजीराजेंनी या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER