‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं’;उदयनराजेंचा पवारांना इशारा

Udayanraje Bhosale

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे फार मोठे नेते आहेत. त्यांना राजकारणातील अनेक वर्षाचा अनुभव आहे, आजही ते या वयात एवढे फिरत आहेत. मी आज त्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी ते म्हणाले, तुम्ही आमचेच आहात नंतर बोलू. पण मला एवढेच सांगायचे आहे, फसवाफसवी कराल तर आम्हाला पण कळते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची विश्रामगृहवर भेट घेतली. दोघांमध्ये एकांतात झालेल्या चर्चेचा पूर्ण तपशील कळू शकलेला नाही. मात्र, चर्चा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या उदयनराजेंनी पत्रकारांना चर्चा बाबत माहिती दिली तेव्हा ते म्हणाले की मी म्हटलं की ‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं’ हे वाक्य इथेच थांबवत ते तिथून निघून गेले.

दरम्यान,विश्रामगृहाच्या पायऱ्या उतरताना पोर्चमध्ये शरद पवार यांची गाडी होती. यावेळी उदयनराजेंनी चुकुन शरद पवार यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. मात्र, चालकाकडे पाहून त्यांना ही आपली गाडी नसून पवार साहेबांची असल्याचे कळताच माघारी परतले. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मात्र, उदयन राजेंनी ‘साहेबांची गाडी आहे. एवढं काय…कलर एकच आहे. वाटले आपली गाडी.’ असे म्हणत वेळ मारून नेली.