जोकोवीचचा ‘लकी लुजर’कडून पराभव संशयाच्या घेऱ्यात

Lucky Loser

जगातील नंबर वन टेनिसपटू (Tennis) नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) याचा व्हिएन्ना टेनिस स्पर्धेत ‘लकी लूजर’ (Lucky loser) खेळाडू लाॕरेन्झो सोनेगोकडून (Laurenzo Sonego) दारुण पराभव संशयाच्या घेऱ्यात आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना जोकोवीचने 2-6, 1-6 असा गमावला मात्र आपल्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा पराभव पत्करल्यावरसुध्दा जोको’ने जेवढ्या शांतपणे आणि जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन ‘जोकोवीच’ खरोखरच या सामन्यात पूर्ण गंभीरतेने खेळला होता का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एरवी एकेका गुणासाठी झगडणारा, प्रसंगी पंचांशी वाद घालणारा जोकोवीच या सामन्यात फक्त तीन गेम घेऊ शकला, दुसऱ्या सेटमध्ये तब्बल सहा ब्रेकपाॕईंट असताना तो एकाचाही फायदा घेऊ शकला नाही त्यामुळेच जोको’ने हा सामना अगदीच सहजतेने घेतला अशी शंका आहे.

त्याची पुष्टी सामन्यानंतरच्या त्याच्याच प्रतिक्रियेने झाली. तो म्हणाला, मी जे उद्दीष्ट घेऊन येथे आलो होतो ते साध्य झाले आहे. म्हणून या निकालाने फार फरक पडत नाही. पुढच्या सामन्यांकडे बघू या.

जोकोवीचची ही प्रतिक्रिया जागतिक क्रमवारीत वर्षअखेर त्याचे सर्वोच्च स्थान निश्चित झाल्यासंदर्भात होती. या स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठताच तो वर्षअखेरही नंबर वन राहणार हे स्पष्ट झाले होते. बोर्ना कोरीकवर आदल्या सामन्यात विजय मिळवल्यावर तो वर्षअखेर नंबर वन राहणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर लगेचच हा सामना झाला आणि त्यात जोको पराभूत झाल्याने ही शंका उपस्थित झाली आहे.

जोकोवीचच्या या वर्तनाने तो सोशल मीडियावर पुन्हा एकदा टेनिसप्रेमीच्या रोषाला बळी पडला आहे. बहुतेकांनी म्हटलेय की, लॕक आॕफ एफर्टसाठी म्हणजे गांभिर्याने न खेळणे हे मॕचफिक्सिंगचाच दुसरा प्रकार आहे. जोकोवीच आहे म्हणून त्याच्या अशा कृत्यांकडे दुर्लक्ष होते पण बर्नार्ड टाॕमिकसारख्या खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंना मात्र शिक्षा होते.

काहींनी म्हटलेय की, यशस्वी असूनही आपल्याला फेडरर व नदालसारखी लोकप्रियता का नाही असा प्रश्न जोकोवीचला पडतो तर त्यामागचे कारण त्याचे हे असे वर्तन आहे. आपले पैसे आणि वेळ खर्चुन त्याचा खेळ बघायला आलेल्या प्रेक्षकांची ही फसवणूक आहे. कोविडनंतर अनेक आडचणींवर मात करुन आलेल्या जनतेचा हा घोर अपमान आहे.

जोकोवीच आणि त्याच्या कुटूंबियांनी यंदा सातत्याने नवनवीन वाद निर्माण केले आहेत. जोकोवीचच्या आई वडिलांनी राॕजर फेडररबद्दल उलटसुलट विधाने केली होती तर त्याचा भाऊ, त्याची पत्नी व स्वतः जोकोनो कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम व बंधने झुगारून एड्रिया टूर टेनीस स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर युएस ओपन टेनिस स्पर्धेत त्याने लाईनवूमनला चेंडू मारल्याचा वाद झाला होता. फ्रेंच ओपनवेळी पाब्लो कॕरेनो बस्टा याने त्याच्यावर दुखापतींचे नाटक करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता गांभिर्याने न खेळण्याचा त्याच्यावर आरौप झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER